Karnataka Election Result 2023 : भाजप करणार पराभवाचे विश्लेषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka Election Result 2023 BJP analyze defeat politics

Karnataka Election Result 2023 : भाजप करणार पराभवाचे विश्लेषण

बंगळूर : कर्नाटकमधील सत्ता गमावल्यानंतर भारतीय जनता पक्ष पराभवाचे विश्लेषण करणार आहे. प्रदेश शाखा विधानसभेचा एकूण एकूण निकाल तसेच मतदारसंघनिहाय छाननी करून पक्षाच्या गच्छंतीची कारणे शोधणार आहे. मावळते मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ही माहिती दिली.

रविवारी प्रदेश कार्यालयात बोम्मई यांच्यासह पक्षाच्या काही नेत्यांची बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निवडणूक निकालांबाबत अनौपचारिक चर्चा झाली. विविध विभागांतून माहिती मिळविण्यावरही चर्चा झाली. आता लवकर सर्व विजयी उमेदवारांची बैठक घेण्यात येईल. त्यानंतर सर्व उमेदवारांची बैठक होईल. त्यात आगामी काळात पक्षाचे संघटन आणि पक्ष भक्कम करण्याच्यादृष्टीने सखोल चर्चा होईल.

भाजपची मतांची टक्केवारी कायम राहिली, पण जागांची संख्या कमी झाली. त्यामुळे मतदारसंघनिहाय टक्केवारीवरून प्रस्थापित लोकप्रतिनिधीच्या विरोधातील जनमतासारखी कारणे कळू शकतील.

विरोधी पक्षनेत्याचा निर्णय नाही

अपयशाची जबाबदारी घेऊन प्रदेशाध्यक्ष कटील राजीनामा देण्याची शक्यता आहे का, या प्रश्नावर बोम्मई यांनी स्पष्ट केले की, तसा कोणताही प्रश्न नाही आणि तशी चर्चा झालेली नाही. विरोधी पक्षनेता कोण होणार याबाबत चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हिंदुत्वाचा मुद्दा...

भाजपने ही निवडणूक हिंदुत्वाच्या अजेंड्यावर लढविली नसल्याचा दावा करून बोम्मई म्हणाले की, असे काही जणांच्या मनात आहे. आम्ही डबल-इंजिन सरकारच्या विकासाच्या मुद्द्यावर लढलो. काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यातून ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला.

लिंगायत, वोक्कलिगा...

काँग्रेसने लिंगायत पट्ट्यात चांगली कामगिरी केली, असे निदर्शनास आणले असता बोम्मई म्हणाले की, लिंगायत असोत किंवा वोक्कलिगा...निकालावर जातींचा एकत्रित परिणाम होतो. फक्त एकच जात तुम्हाला जिंकवू किंवा हरवू शकत नाही. उमेदवाराची निवड आणि कार्यकाळासारख्या काही घटकांवरही हे अवलंबून असते. त्यामुळेच सखोल छाननी करणार आहोत.

बोम्मई म्हणाले

भाजप फक्त निवडणुकीपुरते काम करीत नाही, तर पक्षसंघटन ही एक अखंड प्रक्रिया असते. आम्ही अत्यंत नम्रतेने पराभव स्वीकारत आहोत, आम्ही त्याची कारणे शोधू, त्यात सुधारणा करू आणि पुढे वाटचाल करू

टॅग्स :KarnatakaBjpelection