Karnataka Election Result : डि. के. शिवकुमार मध्यरात्री मतमोजणी केंद्रावर पोहचले अन्... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Karnataka Election Result

Karnataka Election Result : डि. के. शिवकुमार मध्यरात्री मतमोजणी केंद्रावर पोहचले अन्..., बंगळुरूमध्ये हाय होल्टेज ड्रामा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 135 जागांवर विजय मिळवत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला. मात्र, निकाला दिवशी बंगळुरूमध्ये मध्यरात्री हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. यावेळी तिथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डि. के. शिवकुमारसुद्धा उपस्थित होते. (Karnataka Election Result High holtage drama D K Shivakumar counting center at midnight )

कर्नाटकमधील सर्व निकाल काल रात्री निवडणूक आयोगाकडून निकाल स्पष्ट झाला होता. परंतु, बंगळुरुतील जयनगर मतदारसंघातील जागेचा निकाल लागणे बाकी होता. रात्री उशिरा या जागेवर काँग्रेसनेच दावा केला. मात्र, हाय होल्टेज ड्राम्यानंतर काँग्रेसने मिळवलेल्या जागेवर भाजपने कब्जा केला.

नेमकं काय घडलं?

बंगळुरूतील जयनगर मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू असताना सुरुवातीच्या कलांनुसार काँग्रेसच्या उमेदवार सौम्या रेड्डी आघाडीवर होत्या. मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी जयनगर मतदारसंघासाठी काँग्रेसच्या उमदेवार सौम्या रेड्डी यांना घोषितही केलं. परंतु, या मतमोजणीवर भाजपाने आक्षेप घेतला. त्यांनी पुन्हा फेरमतमोजणीची मागणी केली.

मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ पाहायला मिळाला. मध्यरात्रीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डि. के. शिवकुमार, सौम्या रेड्डी यांचे वडील आणि कार्यकारी अध्यक्ष रामलिंगा रेड्डीसह त्यांची कायदेशीर टीम मतमोजणी केंद्रावर आली. त्यानंतर फेरमोजणी करण्यात आली.

या फेरमोजणीत भाजप उमेदवाराचे सकाळी अवैध ठरवलेली मते वैध ठरवण्यात आली. त्यामुळे भाजप उमेदवाराच्या मतमोजणीची आकडेवारी वाढली. परिणामी, भाजपा उमेदवार राममूर्ति यांना पहाटे विजयी घोषित करण्यात आले.

अवघ्या १६ मतांच्या फरकाने काँग्रेस उमेदवार सौम्या रेड्डी यांना पराभव स्वीकारावा लागला. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळानुसार, काँग्रेस उमेदवार सौम्या रेड्डी यांना ५७ हजार ७८१ मते मिळाली असून राममूर्ति यांना ५७ हजार ७९७ मते मिळाली आहेत. काँग्रेसने ही जागा गमावली असल्याने कर्नाटकात काँग्रेसची संख्या १३५ झाली असून भाजपाची ६६ झाली आहे.