
Karnataka Exit Poll: मुंबई-कर्नाटक रिजनमध्ये कोणाला मिळेल जनतेची पसंती? एक्झिट पोल म्हणतात...
बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं मतदान आज पार पडलं, यानंतर एक्झिट पोलही जाहीर झाले आहेत. यामध्ये मुंबई-कर्नाटक रिजनमध्ये अर्थात मराठी भाषिक भागातील जिल्ह्यांमध्ये कोणाचा दबदबा असेल हे देखील या पोल्समधून समोर आलं आहे. इंडिया टुडे-अॅक्सि माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, इथं काँग्रेसच आघाडीवर असल्याचं चित्र आहे. (Karnataka Exit Poll Who will be preferred in Mumbai Karnataka region What exit polls says)
मुंबई-कर्नाटक रिजन काय आहे?
कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री जेसी मधुस्वामी यांनी सांगितलं होतं की, केंद्रीय मंत्रीमंडळानं कर्नाटकातील मराठी बहुल भाग अर्थात मुंबई-कर्नाटक रिजन निश्चित केला आहे. या रिजनमध्ये उत्तर कन्नड, बेळगाव, धारवाड, विजयपुरा, बागलकोट, गदग आणि हवेरी (कित्तूर कर्नाटक) या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे.

एक्झिट पोल्स काय म्हणतात?
मुंबई-कर्नाटक रिजनमध्ये ५० जागा असून यामध्ये पक्षनिहाय वोट शेअर कसं असेल? याची माहिती देण्यात आली आहे. इंडिया टुडे-अॅक्सि माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला ४२ टक्के, काँग्रेसला ४५ टक्के, जेडीएसला ८ टक्के तर इतर पक्षांना मिळून ५ टक्के मतं मिळू शकतात. तर जागांबाबत भाजपला २१, काँग्रेसला २८, जेडीएसला १ आणि इतर पक्षांना ० जागा मिळतील असा अंदाज एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आला आहे.
त्यामुळं यामध्ये काँग्रेसच आघाडीवर राहिलं असं चित्र आहे. त्यामुळं राज्यातही काँग्रेस आघाडीवर असेल तर मराठी बहुल भागातही काँग्रेसच आघाडीवर असेल असा कल आहे.