
कर्नाटकातील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांना आता रात्रपाळीही करता येणार आहे. राज्य शासनाने याबाबतचा महत्त्वाचा आदेश बुधवारी जारी केला आहे. त्यानुसार फॅक्टरी ॲक्टप्रमाणे नोंदणी झालेल्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांना सायंकाळी सात ते सकाळी सहा या वेळेत काम करता येणार आहे.
बंगळूर - कर्नाटकातील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांना आता रात्रपाळीही करता येणार आहे. राज्य शासनाने याबाबतचा महत्त्वाचा आदेश बुधवारी जारी केला आहे. त्यानुसार फॅक्टरी ॲक्टप्रमाणे नोंदणी झालेल्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांना सायंकाळी सात ते सकाळी सहा या वेळेत काम करता येणार आहे.
शासनाने हा आदेश बजाविताना मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल उचलून धरला आहे.
न्यायालयाने फॅक्टरी ॲक्ट १९४८ कलम ६६ (१) (बी) कमी केल्याने यापुढे महिलाही रात्रपाळीसाठी काम करू शकतात, असे म्हटले आहे. यापूर्वी या कलमान्वये महिलांना रात्रीच्या वेळेस कारखान्यात काम करण्याची संधी नव्हती.
राज्यात सध्या केवळ माहिती तंत्रज्ञान आणि त्याच्याशी संबंधित सेवा क्षेत्रांमध्ये महिलांना रात्रीच्या वेळेस काम करण्याची संधी आहे. मात्र, शासनाने बजाविलेल्या नव्या आदेशानुसार यापुढे सर्वच कारखान्यांमध्ये महिला रात्रपाळी करू शकणार आहेत.
बंगळूर, बेळगाव आणि राज्यातील इतर ठिकाणी वस्त्रोद्योगासह इतर उत्पादन क्षेत्रात महिलांना केवळ सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत काम करण्याची मुभा दिली जात होती. रात्रपाळीसाठी केवळ पुरुष कामगारांचा वापर केला जात होता. समान वेतन आणि इतर मुद्द्यांवर तसेच अधिक कामाच्या तासासाठी अनेकवेळा महिलांना संधी दिली जात नव्हती. मात्र, शासनाने मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेत केवळ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रच नव्हे, तर आता उत्पादन क्षेत्रातील महिलांनाही रात्रपाळीची संधी उपलब्ध करून दिली आहे.