PM मोदींनी उद्घाटन केलेल्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'वर पुन्हा दगडफेक; खिडक्यांचं मोठं नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mysore-Chennai Vande Bharat Express Train

या वर्षाच्या सुरुवातीला पश्चिम बंगालमधील मालदा इथं हावडाहून जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली होती.

PM मोदींनी उद्घाटन केलेल्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'वर पुन्हा दगडफेक; खिडक्यांचं मोठं नुकसान

बेंगळुरू : म्हैसूर-चेन्नई वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनच्या (Mysore-Chennai Vande Bharat Express Train) दोन खिडक्यांचं नुकसान झालंय. जेव्हा ही रेल्वे कृष्णराजपुरम-बेंगळुरू कॅन्टोन्मेंट रेल्वे स्थानकांत पोहोचली, तेव्हा काही बदमाशांनी त्यावर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्या.

दक्षिण-पश्चिम रेल्वेनं (South Western Railway) ही माहिती दिलीये. मात्र, या घटनेत कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही. ही दगडफेक कोणी केली याचा तपास अधिकारी करत आहेत.

म्हैसूर-चेन्नई वंदे भारतला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गेल्या वर्षी 11 नोव्हेंबरला हिरवा झेंडा दाखवला होता. ही एक्स्प्रेस आठवड्यातून सहा दिवस धावते. चेन्नई सेंट्रल येथून सकाळी 5:50 वाजता निघते आणि दुपारी 12:30 वाजता म्हैसूरला पोहोचते. दरम्यान, बेंगळुरूमधील केएसआर स्टेशनवर ही रेल्वे थांबते.

या वर्षाच्या सुरुवातीला पश्चिम बंगालमधील मालदा इथं हावडाहून जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली होती. ही घटना 2 जानेवारीला घडली. याच्या एका दिवसानंतर दार्जिलिंगहून आलेल्या वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीची घटना समोर आली.

दुसरीकडं, 20 जानेवारीलाही वंदे भारत ट्रेनवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली होती, ही एक्सप्रेस ट्रेन न्यू जलपाईगुडीहून हावडाकडं जात होती. बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील हल्लेखोरांनी त्यावर दगडफेक केली होती. गेल्या काही दिवसांत रेल्वेवर दगडफेकीच्या घटना वारंवार घडत आहेत. रेल्वे संरक्षण दलानं (RPF) दक्षिण पश्चिम रेल्वेच्या बेंगळुरू विभागात जानेवारीमध्ये दगडफेकीचे 21 आणि फेब्रुवारी 2023 मध्ये 13 गुन्हे नोंदवले आहेत.