मृतदेह बसबरोबर फरफटत गेला 70 किमीपर्यंत...

वृत्तसंस्था
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

बंगळूरपासून सुमारे 70 किमी अंतरावर असलेल्या चन्नपटणा येथे बसला एक सौम्य धक्का बसल्याचे मला ऐकु आले. अर्थात तो रस्त्यावरील दगड असेल, असे मला वाटल्याने मी गाडी चालवित राहिलो

बंगळूर - कोन्नूर (तमिळनाडू) येथून बंगळूर येथे येत असलेल्या कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या (केएसआरटीसी) बसला अडकून एक मृतदेह तब्बल 70 किलोमीटपर्यंत फरफटत आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मोईनुद्दीन या 45 वर्षीय बसचालकास अटक करण्यात आली आहे. या मृतदेहाची ओळख अद्यापी पटलेली नाही.

""बंगळूरपासून सुमारे 70 किमी अंतरावर असलेल्या चन्नपटणा येथे बसला एक सौम्य धक्का बसल्याचे मला ऐकु आले. अर्थात तो रस्त्यावरील दगड असेल, असे मला वाटल्याने मी गाडी चालवित राहिलो,'' असे मोईनुद्दीन यांनी सांगितले. ही बस बंगळूर येथे मध्यरात्री पोहोचली. यानंतर सकाळी बस धुतली जात असताना स्वच्छता कर्मचाऱ्यांना त्यामध्ये खालच्या बाजुस एक मृतदेह अडकल्याचे आढळून आले.

""अपघातानंतर रस्त्यावर पडलेले मृतदेह गाड्यांना अडकून काहीशे मीटर अंतरापर्यंत फरफटत आल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र एखादा मृतदेह बसमध्ये अडकून 70 किमीपर्यंत फरफटत आल्याच्या या घटनेमुळे सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला आहे,'' अशी प्रतिक्रिया केएसआरटीसीच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.

Web Title: karnataka news accident