इस रंग बदलते कर्नाटक मे....

योगिराज प्रभुणे
बुधवार, 16 मे 2018

बंगळूर - निवडणुकीचे राजकारण किती रंग बदलणारे असते याचा प्रत्यय मंगळवारी कर्नाटकची राजधानी बंगळूरमध्ये आला. सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या नऊ तासांमध्ये राजकारणाचे तीन परस्परविरोधी रंग बंगळूरने आणि पर्यायाने देशाने पाहिले.

बंगळूर - निवडणुकीचे राजकारण किती रंग बदलणारे असते याचा प्रत्यय मंगळवारी कर्नाटकची राजधानी बंगळूरमध्ये आला. सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या नऊ तासांमध्ये राजकारणाचे तीन परस्परविरोधी रंग बंगळूरने आणि पर्यायाने देशाने पाहिले.

निवडणूक निकालांना सुरवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भारतीय जनता पक्षाने 117 जागांपर्यंत आघाडी घेतली होती. हा कल कायम राहील, असे चित्र दुपारपर्यंत दिसत होते. त्यामुळे रस्त्यारस्त्यांवर ठिकठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता. सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत राजकारणाचा रंग भाजपचे "कमळ'ला फुलवून गेला. भाजप शहर कार्यालयातील भगव्या गुलालाची मुक्त उधळण झाल्याचे चित्रदेखील दिसले. सर्व कार्यकर्त्यांमध्ये "मोदी... मोदी' ही एकच घोषणा ऐकायला येत होती.

दुपारी दोन-अडीच वाजेपर्यंत असलेले हे चित्र त्यानंतर हळूहळू बदलू लागले. आघाडीवर असलेला भाजप मागे पडू लागला. कॉंग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष यांनी या जागांवर बाजी मारली. पाहता पाहता "कमळ' कोमेजत गेले आणि अचानक धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या हिरव्या-पांढऱ्या झेंड्याने कर्नाटकच्या राजकीय रंगमंचावर प्रमुख भूमिकेत प्रवेश केला.

कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची दुपारी तीन वाजल्यानंतर रस्त्यावर गर्दी वाढली. हाताचा पंजा असलेले झेंडे रस्त्यांवर फडकू लागले. विद्यमान मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस प्रमुख नेते सिद्धरामय्या यांच्या नावाने घोषणाबाजी सुरू झाली. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे चित्र कायम होते. या नऊ तासांमध्ये तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची अक्षरशः घालमेल झाली. मोदींच्या नावाचा जयघोष करत भाजपचा भगवा झेंडा फडकविणारे कार्यकर्ते कॉंग्रेसच्या खेळीमुळे कावरेबावरे झाले. पराभवाच्या छायेत असल्याने काळवंडलेले कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे चेहरे संध्याकाळी उजळून निघाले. धर्मनिरपेक्ष जनता दलाला अचानक लागलेल्या "लॉटरी'ने त्यांच्या कार्यकर्त्यांचा आवाज मावळत्या सूर्याबरोबर टिपेला पोचला.

सत्ता स्थापनेचा दावा करून कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एकत्र राज्यपालांकडून बाहेर पडताना "पंजा' आणि हिरव्या- पांढऱ्या रंगाचे झेंडे एकत्र फडकत असल्याचे चित्र राजभवनाबाहेर दिसले.

Web Title: karnataka vidhansabha election result BJP Congress JDS Politics