काँग्रेसमुळे अडकला भाजपचा घास

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 16 मे 2018

गोव्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जेडीएसबरोबर हातमिळवणी
नवी दिल्ली - राजकारणातली अतर्क्‍यता आणि चैतन्यशीलता याचा नाट्यमय प्रत्यय कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने आला. काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) नेत्यांनी राजकीय चपळाई व चातुर्य दाखवून विजयी घोडदौड करणाऱ्या भाजपचा वारू रोखण्यात यश मिळवले. जेडीएसने सबळ भाजपपेक्षा तुलनेने दुर्बळ काँग्रेसचा मैत्रीचा हात स्वीकारला. तोंडाशी आलेला विजयाचा घास निसटल्याने भाजपच्या उत्साहावर पाणी पडले, तर पराभवातही विजयाचा आनंद मानून काँग्रेसने आपले नीतिधैर्य कायम राखण्याचा प्रयत्न केला.

गोव्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जेडीएसबरोबर हातमिळवणी
नवी दिल्ली - राजकारणातली अतर्क्‍यता आणि चैतन्यशीलता याचा नाट्यमय प्रत्यय कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने आला. काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) नेत्यांनी राजकीय चपळाई व चातुर्य दाखवून विजयी घोडदौड करणाऱ्या भाजपचा वारू रोखण्यात यश मिळवले. जेडीएसने सबळ भाजपपेक्षा तुलनेने दुर्बळ काँग्रेसचा मैत्रीचा हात स्वीकारला. तोंडाशी आलेला विजयाचा घास निसटल्याने भाजपच्या उत्साहावर पाणी पडले, तर पराभवातही विजयाचा आनंद मानून काँग्रेसने आपले नीतिधैर्य कायम राखण्याचा प्रयत्न केला.

कोणतीही किंमत देऊन कर्नाटकात भाजपचे सरकार स्थापन करू द्यायचे नाही, हा निश्‍चय काँग्रेसने केलेला होता. ती बाब लक्षात ठेवूनच गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत हे काँग्रेसचे नेते काल रात्रीच बंगळूरमध्ये दाखल झाले होते. काँग्रेसने या वेळी दाखवलेल्या राजकीय तत्परतेला गोवा, मणिपूर व मेघालयात दाखविलेल्या राजकीय ढिलाईची पार्श्‍वभूमी लाभली होती. या तिन्ही ठिकाणी दाखविलेल्या ढिलाईमुळे काँग्रेसला सत्ता गमवावी लागली होती. त्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठीच काँग्रेसने सर्व शक्‍यता गृहीत धरून स्वतःला आलेल्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी सुसज्ज केले.

कर्नाटकमध्ये सकाळपासून निकाल आणि साधारण जनमताचा कौल आणि त्याचा कल भाजपकडे झुकतानाचे चित्र समोर येऊ लागले. परंतु पूर्ण बहुमताकडे वाटचाल करू लागलेल्या भाजपची गाडी १०५च्या पुढे जात नसल्याचे आढळून आल्यानंतर आणि काँग्रेसची संख्या सत्तर पार करू लागल्यानंतर काँग्रेसनेत्यांनी उचल खाल्ली आणि प्रतिकूल परिस्थितीही अनुकूल करून घेण्यासाठी त्यांनी आपले पत्ते उघड करायला सुरवात केली.

आजच्या घडामोडींमध्ये काँग्रेसने आपल्या केंद्रीय नेत्यांना आदल्या रात्रीपासूनच बंगळूरमध्ये तैनात करून काही प्रमाणात भाजपवर आघाडी घेतली होती. काँग्रेसचे नेते कर्नाटकात तळ ठोकून असताना भाजपचे केंद्रीय नेते व मुख्यतः कर्नाटकाची जबाबदारी असलेले केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर हे दिल्लीत पत्रकारांशी वार्तालाप करीत होते. काँग्रेस व जेडीएसने हातमिळवणीची अधिकृत घोषणा करून सारकार स्थापनेच्या दाव्यासाठी पावले टाकण्यास प्रारंभ केल्यानंतर भाजपने प्रकाश जावडेकर यांच्यासह आरोग्यमंत्री जगतप्रकाश नड्डा आणि पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान या तिघांना कर्नाटकाला धाडले.

युक्ती भाजपवर उलटविली
थोडक्‍यात गोवा, मेघालय आणि मणिपूरमध्ये भाजपने वापरलेली युक्ती काँग्रेसने कर्नाटकात त्यांच्यावर उलटविण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी त्यांना ७५ पेक्षा अधिक जागा मिळाल्याचा मुख्य आधार मिळाला. जेडीएसबरोबर हातमिळवणी करताना पूर्ण बहुमतासाठी लागणारे संख्याबळ (किमान ११३) प्राप्त होत असल्याचे निदर्शनाला आल्यानंतरच काँग्रेसने आपले पत्ते खेळले.

इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा विजय असो! 
- राज ठाकरे, मनसे अध्यक्ष 

ईव्हीएमबाबत सर्वांच्या मनात संशय असल्याने भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन तो काढून टाकावा. ज्या ठिकाणी पोटनिवडणुका होतात त्यामध्ये भाजपला पराभव पत्करावा लागतो, तर सार्वत्रिक निवडणुकांमध्ये विजय होतो. या निवडणुकीत ज्यांचा विजय झाला त्यांचे अभिनंदन, पण जो मुख्यमंत्री होईल त्यांनी मराठी माणसाचा आदर करावा.
- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

कर्नाटकमध्ये ग्राउंड लेवलला माझा जास्त परिचय नाही; परंतु मला जी माहिती मिळत होती. त्यावरून काँग्रेसची परिस्थिती चांगली होती आणि आजचे निकाल पाहिले तर एवढ्या मोठ्या प्रमाणात भाजप निवडून येणं आणि कमी प्रमाणात काँग्रेस निवडून येणं हे मिळत असलेल्या फिडबॅकशी सुसंगत नव्हते. ग्राउंड रिॲलिटीमध्ये लोकांच्या मनात होते तेच फिडबॅकमध्ये येतं; परंतु कर्नाटकात तसे झाले नसल्याने भाजपचा विजय पटणारा नाही
- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

कर्नाटकच्या अनपेक्षित निकालावरून मतदान प्रक्रियेवर शंका निर्माण झाली आहे. याबाबत निवडणूक आयोगाने पुढे येऊन लोकांच्या शंकांचे समाधान केले पाहिजे. हा निकाल आम्हाला नाही तर सर्वांनाच अनपेक्षित आहे. काँग्रेस मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, असे वाटत होते. पण अनपेक्षित निकाल लागला आहे.
- पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

आता भंडारा जिंकू ठोकून... पालघर जिंकू ठासून..!
- आशिष शेलार, भाजप मुंबई विभागीय अध्यक्ष

Web Title: karnataka vidhansabha election result BJP Congress JDS Politics