लिंगायत मतांनी बदलला निकाल!

लिंगायत मतांनी बदलला निकाल!

लिंगायत आणि एसी-एसटी मतदारांचा प्रभाव असलेल्या कर्नाटकात सुमारे १५० जागा आहेत. या जागांवर भाजपची कामगिरी चांगली झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. या भागातील ७२ जागा भाजपच्या खात्यात जमा झाल्या, काँग्रेसला ६० जागा मिळाल्या आहेत. याआधीच्या तीन निवडणुकीतही लिंगायत समाजाचा प्रभाव असलेल्या भागात जो पक्ष चांगली कामगिरी करेल त्या पक्षाचे सरकार बनते, हा अनुभव आला होता. 

कर्नाटकात १८ टक्‍के लिंगायत समाजाचा सर्वाधिक प्रभाव आहे. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (बीजेपी) व येडियुरप्पांचा पक्ष (केजेपी) स्वतंत्रपणे लढल्याने भाजपबरोबरच लिंगायत प्रभावाची सत्ता गेली. मुस्लिम, दलित आणि कुरबा (धनगर) हे घटक मोठ्या प्रमाणात काँग्रेसबरोबर राहिल्याने त्यांची सत्ता आली. वोक्‍कालिंग हे नेहमीप्रमाणे देवेगौडांच्या (जेडीएस) पक्षाबरोबर राहिले. या वर्षीच्या निवडणुकीत येडियुरप्पांच्या माध्यमातून लिंगायत समाजाला सत्ताधारी बनण्याची संधी होती आणि त्या दृष्टीने लिगायतांनी पावले टाकली. 

कर्नाटक विधानसभेची निवडणूक घोषित होण्यापूर्वी सहा महिने अगोदर काँग्रेसचे वातावरण होते. त्यानंतर लिंगायताचा मुद्दा आला आणि त्याभोवतीच राजकारण फिरत राहिले. मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी लिंगायतांना स्वतंत्र धर्ममान्यता आणि अल्पसंख्याक दर्जासाठी केंद्र शासनाकडे शिफारस केली. सिद्धारमय्या आणि काँग्रेस बळकट होत असल्याचे दिसत असताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मैदानात उतरले. त्यानंतर लिंगायत स्वतंत्र धर्माच्याविरुद्ध वीरशैव- हिंदू अस्मिता पुढे आणण्यात आल्या. त्याबरोबरच ५०० संस्थानिक मठ भाजपकडे वळविण्यात आले. त्याचे परिणाम कर्नाटकच्या निकालांत दिसून आले.

काँग्रेसचा भर विकासावर होता, तसेच मुस्लिम, दलित, कुरबा ही हक्‍काची मतपेढी होती. त्यातच लिंगायतांच्या मागण्यांचे मोर्चे सुरू झाले. सिद्धारमय्यांनी ही संधी  साधली. त्यादृष्टीने सिद्धारामय्या सकारात्मक पावले टाकत असताना भाजपने प्रतिडाव टाकले.

भाजपचे ‘हिंदू कार्ड’
बंगळूर : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपचा एकही आमदार मुस्लिम नसल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने एकाही मुस्लिमाला तिकीट दिले नव्हते. यूपीप्रमाणे कर्नाटकातही ‘हिंदू कार्ड’ चालविण्याचा भाजपने प्रयत्न केला होता. भाजपने एकाही मुस्लिमाला तिकीट दिले नव्हते. कर्नाटकात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मुस्लिमांची संख्या १३ टक्के आहे.

मायावतींचा उमेदवार जिंकला
मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने कर्नाटकात खाते उघडले आहे. कोलेगल विधानसभा मतदारसंघात बसपचे प्रदेशाध्यक्ष एन. महेश यांनी विजय मिळवला आहे. या मतदासंघातून केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या ‘आरपीआय’नेही निवडणूक लढविली होती. बसपने या निवडणुकीत देवेगौडांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाबरोबर युती केली आहे. बसप उमेदवारांच्या प्रचारासाठी मायावतींनी सभाही घेतल्या होत्या. त्यांच्याविरुद्ध ‘आरपीआय’ने चिक्‍कसावका एस. यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या प्रचारासाठी स्वत: आठवले आले होते. आरपीआयच्या उमेदवाराला दीड हजार मते मिळाली आहेत. महेश यांनी ७० हजारांहून अधिक मतांनी विजय मिळविला.

राहुल गांधी अन्‌ मोदींच्या यात्रा!
निवडणूक प्रचारात राहुल गांधी यांनी ९० दिवसांत आठ वेळा कर्नाटकाचा दौरा केला व १९ मंदिरांमध्ये दर्शन घेतले.  प्रचारासाठी त्यांनी ५२,१२१ किलोमीटरचा प्रवास केला. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी प्रचारासाठी ८० दिवसांमध्ये २७ मठ-मंदिरांमध्ये दर्शन घेतले. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८, ६३४ किलोमीटरचा प्रवास प्रचारासाठी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com