कर्नाटकात लोकशाहीची थट्टा : रजनीकांत

वृत्तसंस्था
रविवार, 20 मे 2018

''कर्नाटकात राज्यपालांनी जे काही केले ते लोकशाहीची थट्टा करणारे आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबद्दल मी न्यायालयाला धन्यवाद देतो. न्यायालयाच्या निर्णयामुळे आज लोकशाही कायम आहे''.

- रजनीकांत

नवी दिल्ली : बी. एस. येडियुरप्पा यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर पायउतार व्हावे लागले. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर दाक्षिणात्य सुपरस्टार आणि नव्याने राजकारणात प्रवेश केलेले रजनीकांत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, राज्यपाल वजूभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती, हा असा प्रकार लोकशाहीची थट्टा करणारा आहे.  

रजनीकांत म्हणाले, कर्नाटकात राज्यपालांनी जे काही केले ते लोकशाहीची थट्टा करणारे आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबद्दल मी न्यायालयाला धन्यवाद देतो. न्यायालयाच्या निर्णयामुळे आज लोकशाही कायम आहे. राज्यपालांनी चुकीच्या पद्धतीने निर्णय दिला. भाजपकडे बहुमतासाठी लागणारा पाठिंबा कधीही नव्हता. काल कर्नाटकमध्ये काय घडले, लोकशाहीचा विजय झाला. भाजपकडून आणखी वेळ मागितला जात होता. राज्यपालांनी भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी दिलेला वेळ लोकशाहीची थट्टा करणारा आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची वेळ रद्द करत लगेचच बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल मी न्यायालयाचे आभार मानतो. सर्वोच्च न्यायालयाने लोकशाही योग्य ठरवली. 

दरम्यान, बी. एस. येडियुरप्पा यांनी बहुमत चाचणीपूर्वी सभागृहात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल वजूभाई वाला यांच्याकडे सादर केला. 

Web Title: In Karnataka was mockery of democracy says Rajinikanth