कर्नाटकमुळे भाजप, संघातील खदखद उघड

शनिवार, 19 मे 2018

देशातील राजकारणावर गेल्या चार वर्षांत विलक्षण पकड मिळवलेल्या भाजपने निवडणुकीनंतर तत्काळ आक्रमकपणा सोडण्याचा रोकडा व्यवहार ठेवला आहे. भाजप संघाचा केवळ राजकीय चेहरा राहिलेला नसून भारतीय राजकारणाशी भाजपने आणि भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने जुळवून घेतले आहे.

गेल्या 48 तासांत कर्नाटकात झालेल्या राजकीय घडामोडींनी भाजपचे पाय मातीचे असल्याचे भारतीय मतदारांना अखेर दिसले. येडियुरप्पा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हेत की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाही नव्हेत; ते एका राज्याचे नेते आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय नेत्यांचे न ऐकता उद्योग केला, तर राष्ट्रीय नेते मदतीला धावून येत नाहीत, हे शनिवारी दुपारी बंगळूरमधल्या विधानसौदामध्ये दिसले. 

कर्नाटकातील प्रचार मोदी यांनी एकहाती केला होता. तालुकापातळीवरील प्रचारात मोदी हिरीरीने उतरले होते. कर्नाटकातील भाजपच्या जागा वाढण्यात मोदींचे यश नाकारता येणार नाही. मात्र, तरीही भाजपला बहुमताचा जादुई आकडा गाठता आला नव्हता. कर्नाटकात भाजप सर्वाधिक जागा मिळूनही बहुमताजवळ न पोहोचल्याने एकाकी होता. या पार्श्वभूमीवर भाजपने संयमाने परिस्थिती अनुकूल होईपर्यंत वाट बघणे अपेक्षित होते. किमान भाजपच्या थिंकटँकमध्ये ही भूमिका होती. 

प्रत्यक्षात येडियुरप्पांनी घाई केली. बहुमत 'मिळवून' दाखवनेच असा जणू ''पण'' केल्यासारखे येडियुरप्पा राजभवनात पोहोचले. त्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी दावा दाखल केला. मुख्यमंत्रीपदाचा शपथविधीही करवून घेतला. या सगळ्या उद्योगांच्या काळात भाजपचे राष्ट्रीय नेते अत्यंत शांत होते. त्यांनी कोणताही दावा केला नाही आणि कोणतीही आततायी प्रतिक्रिया दिली नाही. येडियुरप्पा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे. यापूर्वीही ते मुख्यमंत्री असताना संघाने अडचणीच्या प्रसंगी त्यांची पाठराखण केली होती. संघाचा दक्षिणेतील आक्रमक चेहरा अशी येडियुरप्पांची ओळख होती.

देशातील राजकारणावर गेल्या चार वर्षांत विलक्षण पकड मिळवलेल्या भाजपने निवडणुकीनंतर तत्काळ आक्रमकपणा सोडण्याचा रोकडा व्यवहार ठेवला आहे. भाजप संघाचा केवळ राजकीय चेहरा राहिलेला नसून भारतीय राजकारणाशी भाजपने आणि भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने जुळवून घेतले आहे. परिणामी, येडियुरप्पांचा आततायीपणा, आक्रमकपणा संघाला निवडणुकीनंतरही चालला असता; भाजपला तो जड झाला असता. त्यामुळेच भाजपचे ज्येष्ठ नेते येडियुरप्पांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवेळीही गैरहजर होते. 'तुम्ही उद्योग मांडलाय. तुमचे तुम्ही निस्तरा,' अशी सोयीची भूमिका भाजपने घेतल्याचे स्पष्ट दिसले. एरव्ही भाजप प्रत्येक पदग्रहणाचा सोहळा साजरा करते. कर्नाटकात जो काही सोहळा झाला, तो म्हणजे येडियुरप्पांची घाईगडबड होती. त्यात भाजप नव्हता. 

या साऱया घडामोडींचा स्पष्ट-अस्पष्ट परिणाम म्हणजे येडियुरप्पांना बहुमत गाठण्यात अपयश आले. त्यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. मात्र, ठराव मंजूर होण्याची वाट न पाहता ते राजिनामा देण्यासाठी राजभवनावर निघून गेले. 

वरवर पाहता हा भाजपचा पराभव आहे. मात्र, एक एक बाजू नीट पाहिली, तर भाजप आणि संघ यांच्या विचारधारांमधील सुक्ष्म फरकांमधील हा संघर्ष आहे, हे आता जाणवते आहे. मोदी आणि शहा यांना देशपातळीवर कोणताही तिसरा नेता कधीच नको आहे. त्यांना स्वतःच्याच नव्हे, विरोधी पक्षांमध्येही मोठा नेता कधीच नको आहे. राहूल गांधींना हिणवण्यापासून ते ममता बॅनर्जींना तुसडेपणाने वागविणे या साऱयांमध्ये तिसरा नेता देशात नको, हा उघड अजेंडा दिसतो. येडियुरप्पांनी स्वतःच्या बळावर बहुमत मिळविणे म्हणजे दक्षिण भारतात पर्यायाने राष्ट्रीय राजकारणात भाजपमध्ये तिसऱया शक्तीचा उदय होणे असा झाला असता. येडियुरप्पांच्या आजच्या पराभवाने हा उदय होण्यापूर्वीच अस्त झाला आहे. 

Web Title: #KarnatakaFloorTest Samrat Phadnis writes about BS Yeddyurappa resigns BJP RSS clash