कर्नाटकमध्ये 'सत्ता'पेच

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 16 मे 2018

असेही सत्तासमीकरण
कर्नाटकमध्ये सर्वांत मोठा पक्ष या नात्याने राज्यपाल भाजपलाच सर्वप्रथम सत्तास्थापनेचे आमंत्रण देऊ शकतात. काँग्रेस आणि ‘जेडीएस’ अाघाडीने सत्तास्थापनेचा दावा केला असला, तरी या दोन्ही पक्षांची निवडणुकीपूर्वी युती नव्हती. दोघांकडे मिळून ११६ एवढी आहेत. त्यामुळे यात राज्यपाल वजूभाई वालांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल.

कर्नाटकात त्रिशंकू स्थिती; ‘जेडीएस’च्या पाठीवर ‘हात’
बंगळूर - कर्नाटकमधील आजचा दिवस मोठ्या राजकीय उलथापालथींचा ठरला. कर्नाटक दिग्विजयाचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपने शंभरी पार केली खरी; पण त्यांनाही बहुमताचा ११२ हा जादुई आकडा गाठता आला नाही. हीच संधी साधत काँग्रेसने धर्मनिरपेक्ष जनता दलास (जेडीएस) पाठिंबा देत देवेगौडापुत्र कुमारस्वामींना मुख्यमंत्रिपदाची ऑफर देऊ केली. गोवा, मणिपूरमधील हिशेब चुकता करण्यासाठी काँग्रेसने खेळी खेळत भाजपला कोंडीत पकडले.  

कर्नाटकात एकूण जागा २२४ असल्या तरी जयनगर येथील भाजप उमेदवाराचे निधन झाल्याने आणि राजराजेश्‍वरी येथे बनावट ओळखपत्र सापडल्याने या दोन जागांवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ही लढाई प्रतिष्ठेची केली होती.

आज सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर सुरवातीचे कौल भाजपच्या बाजूने होते. दुपारनंतर मात्र भाजपच्या घोडदौडीला लगाम लागला. 
सत्तेचा लंबक कुणाच्याच बाजूने स्पष्टपणे झुकत नसल्याचे लक्षात येताच काँग्रेसने ‘जेडीएस’- ‘बसप’ आघाडीला पाठिंबा दिला. कर्नाटकातील अस्थिर स्थिती लक्षात घेता केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, धर्मेंद्र प्रधान आणि प्रकाश जावडेकर तातडीने बंगळूरला रवाना झाले. सायंकाळी येडियुरप्पा आणि केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. काँग्रेस आणि ‘जेडीएस’च्या नेत्यांनीदेखील सत्तास्थापनेचा दावा केला. काँग्रेसचा आपल्याला बिनशर्त पाठिंबा असल्याचे कुमारस्वामी यांनी राज्यपालांना सांगितले.

असेही सत्तासमीकरण
कर्नाटकमध्ये सर्वांत मोठा पक्ष या नात्याने राज्यपाल भाजपलाच सर्वप्रथम सत्तास्थापनेचे आमंत्रण देऊ शकतात. काँग्रेस आणि ‘जेडीएस’ अाघाडीने सत्तास्थापनेचा दावा केला असला, तरी या दोन्ही पक्षांची निवडणुकीपूर्वी युती नव्हती. दोघांकडे मिळून ११६ एवढी आहेत. त्यामुळे यात राज्यपाल वजूभाई वालांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरेल.

राज्यपालांनी आम्हाला बहुमत सिद्ध करण्याची संधी दिली आहे. सत्ता स्थापनेचा पहिला अधिकार आमचाच आहे.
- बी. एस. येडियुरप्पा, भाजप नेते

Web Title: #KarnatakaVerdict governor role in Karnataka assembly elections