राज्यपालांच्या भूमिकेवरून काँग्रेसमध्ये साशंकता

वृत्तसंस्था
बुधवार, 16 मे 2018

राहुल यांचे आभारप्रदर्शन 
कर्नाटकच्या निकालानंतर सोनिया गांधी आणि अन्य वरिष्ठ नेते कॉंग्रेसच्या सत्तेसाठी सक्रिय झाले असताना पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्‌विटद्वारे कर्नाटकच्या मतदारांचे आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे आभार मानण्याचे सोपस्कार पार पाडले आहेत. ""या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसला मतदान करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. आपल्या पाठिंब्याचा मनापासून स्वीकार करताना आपल्यासाठी लढण्याची ग्वाही देतो. पक्षासाठी निष्ठेने आणि अथक कष्ट करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचेही मनापासून आभार'', असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे. 

नवी दिल्ली : पराभवानंतर 'धर्मनिरपेक्ष जनता दला'(जेडीएस)शी हातमिळवणी करणाऱ्या काँग्रेसने आता "काँग्रेस - जेडीएस' आघाडीलाच राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी बोलवावे, अशी मागणी केली आहे. तसेच, भाजपच्या नेतृत्वाखालील आघाड्यांना गोवा, मणिपूर, मेघालयमध्ये अशाच प्रकारे सत्तेसाठी पाचारण करण्यात आल्याचा दाखला देत राज्यपालांवरचा दबावही वाढविला आहे. मात्र, राज्यपालांनी बोलावले नाही तर न्यायपालिकेचे दरवाजे ठोठावण्याचा पर्यायही खुला असल्याचे संकेत कॉंग्रेसने दिले आहेत. 

कर्नाटकमध्ये गेलेले काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि अशोक गेहलोत यांनी सोनिया गांधींच्या सूचनेनंतर तातडीने हालचाली करत देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाला सत्तास्थापनेसाठी विनाशर्त पाठिंबा दिला. या खेळीतून भाजपचा वारू रोखण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न असला तरी, यामध्ये राज्यपालांच्या भूमिकेवरून काँग्रेसमध्ये साशंकता आहे. 

सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष म्हणून भाजपला राज्यपाल सत्तास्थापनेसाठी आधी बोलावतील आणि त्यानंतर बहुमत सिद्ध करण्यासाठी आमदारांचा घोडेबाजार रंगेल, अशी भीतीही कॉंग्रेसला आहे. त्यामुळे काँग्रेसने माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचा दाखला देत "कॉंग्रेस-जेडीएस' आघाडीलाच राज्यपालांनी आधी बोलवावे, अशी जोरदार मागणी केली आहे. 

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, कर्नाटकमध्ये कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने 116 जागा जिंकल्या आहेत. दोन्ही पक्षांच्या मतांची टक्केवारी 56 टक्के आहे. आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेसाठी दावा केला आहे. मात्र, बहुमतापासून दूर असलेल्या भाजपकडून बोम्मई प्रकरणाचा हवाला देत आपल्याला निमंत्रण मिळावे, असा प्रयत्न केला जात आहे. 

राहुल यांचे आभारप्रदर्शन 
कर्नाटकच्या निकालानंतर सोनिया गांधी आणि अन्य वरिष्ठ नेते कॉंग्रेसच्या सत्तेसाठी सक्रिय झाले असताना पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्‌विटद्वारे कर्नाटकच्या मतदारांचे आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे आभार मानण्याचे सोपस्कार पार पाडले आहेत. ""या निवडणुकीमध्ये कॉंग्रेसला मतदान करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. आपल्या पाठिंब्याचा मनापासून स्वीकार करताना आपल्यासाठी लढण्याची ग्वाही देतो. पक्षासाठी निष्ठेने आणि अथक कष्ट करणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचेही मनापासून आभार'', असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे. 

Web Title: #KarnatakaVerdict governor role in Karnataka government