किंगमेकरच ठरणार किंग!

Karnataka
Karnataka

कर्नाटकातील निवडणूक निकालाचा देशभरातील राजकीय वातावरणाची दिशा बदलण्यावर परिणाम होणार का? निवडणुकीपूर्वी राजकीय विश्‍लेषकांमध्ये वैचारिक चर्चेचा हा केंद्रबिंदू होता. माध्यमांमध्ये याविषयीच्या चर्चांना उधाण आले होते. यामध्ये जर-तरची गृहितके बरीच होती. काँग्रेस आणि भाजप या प्रमुख पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावून कर्नाटकात पूर्ण ताकदीने प्रचाराचे रान केले. सत्तेच्या शर्यतीतील तिसरा प्रमुख खेळाडू असलेल्या धर्मनिरपेक्ष जनता दलाने विशिष्ट ‘टार्गेट’ ठेवून तेवढ्यावरच लक्ष केंद्रित केले.

बहुचर्चित व लक्षवेधी अशा रणधुमाळीनंतर प्रत्यक्ष मतदान पार पडल्यावर ‘एक्‍झिट पोल’चे जे अंदाज आले, त्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होणार, असे सर्वांचेच म्हणणे होते. या स्थितीत किंगमेकरची भूमिका अर्थातच धर्म निरपेक्ष जनता दल आणि त्यांचे नेते माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि त्यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची राहील, याबाबतही कुणाचेच दुमत नव्हते. निवडणूक निकालावर दृष्टिक्षेप टाकल्यास कर्नाटकात ‘काँटे की टक्कर’ झाल्याचे स्पष्ट दिसते. त्रिशंकू स्थितीचा अंदाजही बरोबर आला; पण जे किंगमेकर ठरणार असे वाटत होते, तेच प्रत्यक्षात किंग बनणार असे चित्र स्पष्ट झाले आहे. इतके सारे झाले असले तरी, जनतेचा कौल नेमका कुणाला मिळाला, याचे स्पष्ट उत्तर मात्र मिळाले नाही, असेच म्हणावे लागेल. 

कर्नाटकात सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सत्ता होती. त्यांचे काम चांगले असल्याची एक प्रतिमा तयार झाली होती.  सत्ताकाळात केलेल्या कामाच्या जोरावर मतदारांची पुन्हा एकदा पसंती काँग्रेसला मिळेल, असा गाढा आशावाद काँग्रेसला वाटत होता. राहुल गांधी यांचे नेतृत्व काँग्रेसला अपेक्षित करिश्‍मा अजूनपर्यंत तरी देऊ शकलेले नाही, हे वास्तव असले तरी, कर्नाटकातील निकालातून काही तरी चमत्कार होऊ शकेल, यावरही काँग्रेसजनांची भिस्त होती. प्रत्यक्ष निकाल पाहता तसे काही घडल्याचे दिसत नाही. उलट नरेंद्र मोदी - अमित शहा निवडणूक रणनीतीत वाकबगार असल्याने दुसरीकडे भाजपचा आत्मविश्‍वास कमालीचा दुणावला होता.   

अलीकडेच त्रिपुरा या राज्याच्या रूपाने मार्क्‍सवाद्यांचा पारंपरिक गडही एकहाती काबीज केल्यानंतर भाजपची घोडदौड एका वेगळ्या उंचीवर पोचल्याची पार्श्‍वभूमी होती. कर्नाटकात भाजपने सर्वाधिक जागा जिंकून ‘सिंगल लार्जेस्ट पार्टी’ हा मान जरूर मिळवला; पण तरीही सत्तेची वाट त्यांच्यासाठी बिकट ठरली. काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने एकत्र येणे व कमी जागा असूनही मुख्यमंत्रिपद काँग्रेसने धजदला देऊ करणे, यामागे असलेल्या राजकीय भूमिका सत्तेच्या सारिपाटात साधारण अपेक्षित दिशेने जातानाच दिसतात. त्रिशंकू स्थितीत राज्यपालांची भूमिका हा घटक निर्णायक ठरतो. आताही तो ठरेल; पण एक मात्र नक्की की, कर्नाटकात येणारे नवे सरकार किती काळ स्थिर राहील, हे आजच्या घडीला ठामपणे सांगता येणार नाही.

गटबाजी भोवली
महाराष्ट्राच्या दृष्टीने कर्नाटकच्या निवडणुकीतील दुसरा महत्त्वाचा मुद्दा सीमाभागाचा. महाराष्ट्र एकीकरण समितीतील अंतर्गत गटबाजी व कलहामुळे समितीला निवडणूक निकालातून भोपळा हाती लागला. होत्या त्या दोन जागाही गेल्या. निवडणुकीच्या निमित्ताने होणाऱ्या राजकारणात लोकेच्छेचीही कशी फरफट होऊ शकते याचे हे उदाहरण. कर्नाटकातील निवडणूक देशातील पुढील सार्वत्रिक निवडणुकीवर कोणताही प्रभाव पाडू शकेल, याची शक्‍यता मात्र यावेळच्या निकालांनी दुरापास्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com