'जेडीएस'साठी सोनियांनी फिरविले चक्र 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 16 मे 2018

सलोख्याचा फायदा 
सोनिया गांधी व देवेगौडा यांच्या दरम्यान असलेल्या सलोख्याच्या संबंधांचाही या वेळी उपयोग झाला. सोनिया गांधी यांनी धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांच्या एकजुटीसाठी ज्या बैठका बोलाविल्या होत्या, त्यात देवेगौडा यांना नेहमीच निमंत्रित करण्यात येत होते. सुरवातीच्या एक-दोन बैठकांमध्ये स्वतः देवेगौडा सामीलही झाले होते व त्यामुळेच कर्नाटकात दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवूनही त्याचे रूपांतर वैमनस्यात झालेले नव्हते. 

नवी दिल्ली : कर्नाटकातील नाट्यमय घडामोडींच्या निमित्ताने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाची अपरिहार्यताही पुन्हा एकदा स्पष्ट झाली. कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) एकत्रित सरकार स्थापन होण्याची शक्‍यता स्पष्ट झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी या पक्षाचे अध्यक्ष व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्याशी संपर्क साधला आणि कर्नाटकात जातीय शक्तींना सत्तेपासून दूर राखण्यासाठी हातमिळवणीचे आवाहन केले आणि त्यांच्या पक्षाला सरकारस्थापनेसाठी बिनशर्त पाठिंब्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर पुढील घडामोडींनी वेग घेतला. 

सोनिया गांधी यांनी या घडामोडींमध्ये पुढाकार घेणे, ही बाब महत्त्वपूर्ण व सूचक मानली जाते. राहुल गांधी अध्यक्ष असले, तरी प्रसंग आल्यास सोनिया गांधी या पक्षाच्या सर्वोच्च नेत्या या नात्याने घडामोडींमध्ये हस्तक्षेप करू शकतात, हेही सिद्ध झाले. या घटनाक्रमात सोनिया गांधी व एकेकाळी त्यांचे राजकीय सचिव असलेले अहमद पटेल यांनी दिल्लीत बसून बंगळूरमध्ये असलेल्या कॉंग्रेस नेत्यांना मार्गदर्शन करणे व जेडीएसच्या नेतृत्वाबरोबर संपर्क व समन्वय साधण्याची कामगिरी बजावली. 

सलोख्याचा फायदा 
सोनिया गांधी व देवेगौडा यांच्या दरम्यान असलेल्या सलोख्याच्या संबंधांचाही या वेळी उपयोग झाला. सोनिया गांधी यांनी धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांच्या एकजुटीसाठी ज्या बैठका बोलाविल्या होत्या, त्यात देवेगौडा यांना नेहमीच निमंत्रित करण्यात येत होते. सुरवातीच्या एक-दोन बैठकांमध्ये स्वतः देवेगौडा सामीलही झाले होते व त्यामुळेच कर्नाटकात दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवूनही त्याचे रूपांतर वैमनस्यात झालेले नव्हते. 

या घटनाक्रमात सोनिया गांधी व एकेकाळी त्यांचे राजकीय सचिव असलेले अहमद पटेल यांनी दिल्लीत बसून बंगळूरमध्ये असलेल्या कॉंग्रेसनेत्यांना मार्गदर्शन करणे व धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या नेतृत्वाबरोबर संपर्क व समन्वय साधण्याची कामगिरी बजावली. आजच्या वेगवान घटनाक्रमात राहुल गांधी यांनी पडद्याआड राहणेच पसंत केले. सोनिया गांधी यांचे "10 जनपथ' हे निवासस्थान घटनाकेंद्र राहिले व राहुल गांधीही तेथे उपस्थित होते. 

देवेगौडा यांनी बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांच्याबरोबर निवडणूक समझोता केला होता व त्यामुळेही ते निवडणुकीनंतर भाजपची साथसंगत करणार नाहीत, असे एक चित्र निर्माण झाले होते व त्याचादेखील फायदा कॉंग्रेस व देवेगौडा एकत्र येण्यात झाला.

Web Title: #KarnatakaVerdict Sonia Gandhi major role in Congress JDS alliance