कार्ती चिदंबरम यांच्यावर "ईडी'कडूनही गुन्हा

पीटीआय
शनिवार, 20 मे 2017

ईसीआयआर हा एकाअर्थी एफआरआर असून, त्याअंतर्गत या प्रकरणात झालेला गैरव्यवहार व संबंधितांच्या मालमत्तेची चौकशी केली जाणार आहे. दोषी आढळल्यास संबंधितांची मालमत्ता जप्तही होऊ शकते, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे

नवी दिल्ली - कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांचे सुपुत्र कार्ती चिदंबरम व संबंधितांवर आज सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा नोंद केला. सीबीआयपाठोपाठ ईडीकडूनही गुन्हा नोंद झाल्यामुळे कार्ती यांच्यासमोरील अडचणी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कार्ती यांच्याशी संबंधित आयएनएक्‍स मीडिया फर्ममधील परकी गुंतवणुकीस मान्यता देताना झुकते माप दिल्याचा आरोप आहे. सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारे आज ईडीने कार्ती, पीटर, इंद्राणी मुखर्जी व अन्य संबंधितांविरोधात सक्त वसुली प्रकरण माहिती अहवाल (ईसीआयआर) नोंद केला आहे. ईसीआयआर हा एकाअर्थी एफआरआर असून, त्याअंतर्गत या प्रकरणात झालेला गैरव्यवहार व संबंधितांच्या मालमत्तेची चौकशी केली जाणार आहे. दोषी आढळल्यास संबंधितांची मालमत्ता जप्तही होऊ शकते, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

याप्रकरणी सीबीआयने पी. चिदंबरम व कार्ती चिदंबरम यांच्या चार शहरांमधील निवासस्थाने आणि कार्यालयांवर मंगळवारी छापे टाकले होते. त्या वेळी प्रकरणाशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे हाती आली आहेत. दरम्यान, पी. चिदंबरम व कार्ती यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

Web Title: Karti Chidambaram booked by ED also