92 वर्षीय करुणानिधी पुन्हा रुग्णालयात दाखल

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

करुणानिधी यांच्या ढासळत्या प्रकृतीच्या पार्श्‍वभूमीवर येत्या 20 डिसेंबर रोजी पक्षाच्या होणाऱ्या बैठकीमध्ये स्टॅलिन यांच्या नावाची पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषणा होण्याची अटकळ बांधण्यात आली आहे

चेन्नई - तमिळनाडूमधील द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) पक्षाचे प्रमुख एम करुणानिधी यांना श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना येथील कावेरी रुग्णालयामध्ये तातडीने दाखल करण्यात आले. करुणानिधी यांना गळा व फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्याचे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. "करुणानिधी यांच्यावर तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या पथकाकडून उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची,' माहिती या रुग्णालयाचे कार्यकारी अध्यक्ष एस अरविंदन यांनी दिली आहे.

92 वर्षीय करुणानिधी यांना काल (गुरुवार) रात्री सुमारे सव्वाअकरा वाजावयाच्या सुमारास त्यांच्या गोपालपुरम येथील निवासस्थानामधून रुग्णालयामध्ये नेण्यात आले. यावेळी त्यांच्याबरोबर डीएमकेचे खजिनदार व त्यांचे पुत्र एम के स्टॅलिन, मुलगी एम कनिमोझी आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेते होते. गेल्या काही दिवसांत या वयोवृद्ध नेत्यास पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी शरीरामधील पाणी कमी झाल्यामुळे त्यांना गेल्या 1 डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही दिवसांच्या उपचारांनंतर त्यांना 7 डिसेंबर रोजी घरी जाण्याची परवानगी देण्यात आली होती.

करुणानिधी यांच्या ढासळत्या प्रकृतीच्या पार्श्‍वभूमीवर येत्या 20 डिसेंबर रोजी पक्षाच्या होणाऱ्या बैठकीमध्ये स्टॅलिन यांच्या नावाची पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषणा होण्याची अटकळ बांधण्यात आली आहे.

तमिळनाडूमधील सध्याच्या संवेदनशील राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.

Web Title: Karunanidhi admitted to hospital again