करुणानिधींचा सहा दशकांचा राजकीय प्रवास

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

भारताच्या राजकारणात सलग सहा दशकांवर सक्रिय राहिलेल्या एम. के. करूणानिधी या नावाने तमिळनाडूतील जनतेवर अधिराज्य गाजवले. चित्रपट कथालेखक, पुरोगामी, अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयत्न, जाचक प्रथा, परंपरांना विरोध, हिंदीविरोधी भुमिका या मुद्दांवर आयुष्यभर लढलेल्या करूणानिधींचे द्रष्टेपण त्यांच्या जीवनातील वाटचालीतून दिसते. डीएमके पक्षाचे सर्वेसर्वा राहिलेले करुणानिधी पाचवेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते.

चेन्नई- भारताच्या राजकारणात सलग सहा दशकांवर सक्रिय राहिलेल्या एम. के. करूणानिधी या नावाने तमिळनाडूतील जनतेवर अधिराज्य गाजवले. चित्रपट कथालेखक, पुरोगामी, अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयत्न, जाचक प्रथा, परंपरांना विरोध, हिंदीविरोधी भुमिका या मुद्दांवर आयुष्यभर लढलेल्या करूणानिधींचे द्रष्टेपण त्यांच्या जीवनातील वाटचालीतून दिसते. डीएमके पक्षाचे सर्वेसर्वा राहिलेले करुणानिधी पाचवेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते.

त्यांच्या साठ वर्षांच्या राजकारणात त्यांनी विजयाचाच इतिहास रचला. लोकसभेच्या 2004 च्या निवडणुकीत करुणानिधींनी "डीएमके'च्या नेतृत्वाखालील डाव्यांसह असलेल्या आघाडीला तमिळनाडू आणि पुडूचेरीतील 40 जागा जिंकून दिल्या. 2009 मधील लोकसभा निवडणुकीत "डीएमके'च्या जागा 16 वरून 18 वर पोहोचल्या; त्याचवेळी त्यांच्या आघाडीने 28 जागा पटकावल्या होत्या. 

पाचवेळा मुख्यमंत्री 
कुलीथलाई (जि. तिरुचिरापल्ली) येथून 1957 मध्ये करुणानिधी तमिळनाडू विधानसभेवर निवडून गेले. 1961 मध्ये ते "डीएमके'चे खजिनदार आणि 1962 मध्ये विधानसभेतील विरोधी पक्ष उपनेते झाले. 1967 मध्ये "डीएमके' सत्तेवर आल्यावर ते सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले. 1969 मध्ये नेते आण्णादुराई यांचे निधन झाल्यानंतर करुणानिधी मुख्यमंत्रीपदी पहिल्यांदा आरूढ झाले. त्यानंतर करुणानिधींनी पक्षाची धुरा सांभाळत पक्षविस्तार केला, त्याला घट्ट जनाधार मिळवून दिला. त्याच्या बळावरच ते पाच वेळा तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. परंपरागत विरोधक जे. जयललिता यांच्या आण्णा द्रमुकला धूळ चारत 2006 ची निवडणूक करुणानिधींनी "डीएमके'ला जिंकून देत, 13 मे 2006 मध्ये ते पाचव्यांदा तमिळनाडूचे मुख्यमंत्रीपद स्विकारले. करुणानिधी 11 वेळा तमिळनाडू विधानसभेवर निवडून गेले , एकदा सध्या विसर्जीत केलेल्या तमिळनाडू विधान परिषदेवर निवडले गेले होते. 

करुणानिधींची वाटचाल 
- 1961 - डीएमकेचे खजिनदार 
- 1962 - राज्य विधानसभेत विरोधी पक्ष उपनेते 
- 1967 - सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री 
- फेब्रुवारी 1969 - जानेवारी 1971 - तमिळनाडूचे पहिल्यांदा मुख्यमंत्री 
- मार्च 1971 - जानेवारी 1976 - तमिळनाडूचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री 
- जानेवारी 1989 - जानेवारी 1991 - तमिळनाडूचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री 
- मे 1996 - मे 2001 - तमिळनाडूचे चौथ्यांदा मुख्यमंत्री 
- मे 2006 - मे 2011 - तमिळनाडूचे पाचव्यांदा मुख्यमंत्री 

तमिळनाडू विधानसभेवर करूणानिधी तब्बल बारा वेळा निवडून गेले आहेत.

Web Title: Karunanidhis political journey for six decades