त्रालमध्ये चकमकीत जवान हुतात्मा; 3 दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
रविवार, 5 मार्च 2017

दहशतवाद्यांची शोधमोहिम सुरु असताना स्थानिक नागरिकांनी जवानांवर दगडफेक केल्याचे वृत्त आहे. हिज्बुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांचा स्थानिक नागरिकांकडून बचाव करण्याचा प्रकार यापूर्वीही काश्मीरमध्ये घडला आहे.

जम्मू - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे आज (रविवार) सकाळी सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान हुतात्मा झाला असून, तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्राल परिसरात हिज्बुल मुजाहिदीन दहशतवादी संघटनेचे तीन ते चार दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस, सीआरपीएफ आणि लष्कराच्या जवानांकडून शोधमोहिम राबविण्यात आली. दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात पोलिस कर्मचारी मंजूर अहमद हे हुतात्मा झाले असून, सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला. या गोळीबाराला दिलेल्या प्रत्युत्तरात तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे. 

दहशतवाद्यांची शोधमोहिम सुरु असताना स्थानिक नागरिकांनी जवानांवर दगडफेक केल्याचे वृत्त आहे. हिज्बुल मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांचा स्थानिक नागरिकांकडून बचाव करण्याचा प्रकार यापूर्वीही काश्मीरमध्ये घडला आहे. आता पुन्हा एकदा अशी घटना घडली आहे.

Web Title: Kashmir: Cop killed in Tral encounter, suspected Hizbul militant trapped