काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य भाग 

वृत्तसंस्था
बुधवार, 27 जून 2018

जम्मू-काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य आणि अखंड भाग आहे. पाकिस्तानचा खोटा युक्तिवाद हे सत्य नाकारू शकत नाही.- संदीपकुमार बय्यपू, वरिष्ठ सचिव, संयुक्त राष्ट्रसंघातील स्थायी अभियान 

न्यूयॉर्क : पाकिस्तानने कितीही आदळआपट केली आणि कितीही खोटे युक्तिवाद केले तरी जम्मू-काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, हे सत्य नाकारता येत नाही, अशा शब्दांत आज भारताने पाकिस्तानला सुनावले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत पाकिस्तानच्या प्रतिनिधीकडून काश्‍मीरचा मुद्दा उपस्थित केला गेला होता. या मुद्‌द्‌याचा संदर्भ घेत भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. 

संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत जगातील हत्याकांड, युद्ध, जातीय दंगल, मानवाधिकाराची पायमल्ली यासारख्या गुन्ह्यांना रोखणे आणि संरक्षणाची जबाबदारी या विषयावर सुरू असलेल्या चर्चेत काल पाकिस्तानचे प्रतिनिधी राजदूत मलीहा लोदी यांनी काश्‍मीरमध्ये हत्याकांडासारखे गंभीर गुन्हे घडत असल्याचे म्हटले होते. पाकिस्तानने काश्‍मीरचे चुकीचे चित्र मांडल्याने आणि भारताच्या घटक राज्यात हस्तक्षेप केल्याने भारताने तीव्र विरोध केला. भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील स्थायी अभियानाचे वरिष्ठ सचिव संदीप कुमार बाय्यपू म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत प्रथमच एवढ्या मोठ्या गंभीर विषयावर चर्चा होत असताना एका प्रतिनिधीने भारताचे राज्य असलेल्या जम्मू-काश्‍मीरचा चुकीचा संदर्भ देत या व्यासपीठाचा दुरपयोग केला. यापूर्वीही पाकिस्तानकडून संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावर काश्‍मीरचा मुद्दा मांडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला आणि या प्रयत्नांना कोणीही पाठिंबा दिला नाही. 

जम्मू-काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य आणि अखंड भाग आहे. पाकिस्तानचा खोटा युक्तिवाद हे सत्य नाकारू शकत नाही.- संदीपकुमार बय्यपू, वरिष्ठ सचिव, संयुक्त राष्ट्रसंघातील स्थायी अभियान 

Web Title: Kashmir is an integral part of India