दहशतवादी हल्ल्यात 4 जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
रविवार, 31 डिसेंबर 2017

गेल्या पाच महिन्यांत सुरक्षा दलांवरील हा तिसरा दहशतवादी हल्ला आहे. ऑगस्टमधील हल्ल्यात आठ जवान शहीद झाले होते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या केंद्रावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यामध्ये एक जवान हुतात्मा झाला होता.

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) प्रशिक्षण केंद्रावर दहशतवाद्यांनी आज (रविवार) पहाटे केलेल्या हल्ल्यात चार जवान हुतात्मा झाले असून, तीन जवान जखमी आहेत. हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

जम्मू काश्मीर पोलिसांच्या माहितीनुसार, पहाटे दोन वाजून दहा मिनिटांनी दहशतवाद्यांनी प्रशिक्षण केंद्रावर हल्ला चढविला. श्रीनगरपासून सुमारे तीस किलोमीटवर पुलवामामध्ये लेथोपोरा या भागात हे 185 बटालियनचे केंद्र आहे. अतिरेक्यांनी केंद्रात घुसून हँडग्रेनेडस् फेकले आणि गोळीबार सुरू केला. सीआरपीएफने तत्काळ प्रत्युत्तर द्यायला सुरूवात केली. मात्र, दरम्यानच्या काळात दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात चार जवान हुतात्मा झाले असून, तीन जवानांना जखमी केले. हल्ला करणाऱ्या तिन्ही दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले असून, शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

'सीआरपीएफ' केंद्रावरील दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी बराच वेळ मोहिम राबविण्यात आली. गेल्या पाच महिन्यांत सुरक्षा दलांवरील हा तिसरा दहशतवादी हल्ला आहे. ऑगस्टमधील हल्ल्यात आठ जवान शहीद झाले होते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या केंद्रावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यामध्ये एक जवान हुतात्मा झाला होता.

Web Title: Kashmir JeM militants attack CRPF camp to avenge Noor Tralis death 1 jawans killed 3 injured