काश्‍मीरचे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

पीटीआय
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

श्रीनगरमध्ये सार्वजनिक वाहतूक सुरू
श्रीनगर - अस्वस्थ काश्‍मीर हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. चार महिने बंद असलेली दुकाने, कार्यालये शनिवारी उघडण्यात आली. फुटीरतावादी संघटनांनी त्यांचा संप आजपासून स्थगित ठेवला असल्याने नागरिक आपल्या नेहमीच्या व्यवहारांसाठी घराबाहेर पडू लागले आहेत.

श्रीनगरमध्ये सार्वजनिक वाहतूक सुरू
श्रीनगर - अस्वस्थ काश्‍मीर हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. चार महिने बंद असलेली दुकाने, कार्यालये शनिवारी उघडण्यात आली. फुटीरतावादी संघटनांनी त्यांचा संप आजपासून स्थगित ठेवला असल्याने नागरिक आपल्या नेहमीच्या व्यवहारांसाठी घराबाहेर पडू लागले आहेत.

हिज्बुल मुजाहिदनचा म्होरक्‍या बुऱ्हाण वणी हा जुलै महिन्यात चकमकीत मारला गेला. तेव्हापासून काश्‍मीर खोरे हिंसाचारात होरपळून निघाले आहे. फुटीरतावाद्यांच्या संपामुळे राज्यातील व्यवहार थंडावले होते. मात्र, गेल्या काही आठवड्यांमध्ये राज्यात तुलनेने शांतता होती. संपाच्या 133 दिवसांनंतर आज प्रथमच येथील दुकाने, कार्यालये, पेट्रोल पंप दिवसभर सुरू होती. काही जणांनी यापूर्वीच दुकाने उघडण्यास सुरवात केली होती.

फुटीरतावाद्यांच्या बंदमध्ये सवलत मिळाली की काही जण त्यांचा व्यवसाय सुरू करीत आहेत.

श्रीनगरच्या रस्त्यावर सार्वजनिक वाहतूकही मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. लोकही नित्याचे व्यवहार करण्यासाठी आज घराबाहेर पडले. वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी पोलिसांची उपस्थिती जाणवणारी होती. अन्य जिल्ह्यांतील जनजीवन सुरळीत होत आहे. खोऱ्यात या आठवड्यात दहावी-बारावीच्या परीक्षाही सुरू झाल्या आहेत. हा बदल म्हणजे शहर पूर्वपदावर येऊ लागल्याचे सुचिन्ह असल्याचेही अधिकारी म्हणाले.

इंटरनेट सेवा सुरू
काश्‍मीर खोऱ्यात गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेली इंटरनेट सेवा शनिवारी मध्यरात्रीपासून सुरळीत झाली. सर्व पोस्टपेड मोबाईलवरील इंटरनेट सेवा सुरू झाली असली तरी प्रीपेड कनेक्‍शनवरील सेवा मात्र बंदच आहे. राज्यातील कायदा व सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतरच ती सुरू करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 9 जुलैपासून येथील इंटरनेटसेवा बंद करण्यात आली होती. ती पुन्हा सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थी, व्यावसायिक व व्यापाऱ्यांकडून सातत्याने होत होती. लॅंडलाइनवरील इंटरनेट सेवा यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. जम्मूत मोबाईल इंटरनेट सेवा याआधीपासूनच सुरू झाली आहे.

Web Title: Kashmir life gradually reinstated