काश्‍मीरमध्ये मोबाईल सेवा दुसऱ्या दिवशीही बंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 ऑगस्ट 2016

श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यात "बीएसएनएल‘चा अपवाद वगळता अन्य सर्व कंपन्यांची मोबाईल सेवा व ब्रॉडबॅंड इंटरनेट सेवा शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी बंद होती.

श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यात "बीएसएनएल‘चा अपवाद वगळता अन्य सर्व कंपन्यांची मोबाईल सेवा व ब्रॉडबॅंड इंटरनेट सेवा शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी बंद होती.

हिज्बुल मुजाहिदीनचा म्होरक्‍या बुऱ्हाण वणी हा चकमकीत मारला गेल्यानंतर काश्‍मीरमध्ये हिंसाचार उसळला. त्यात 58 नागरिक ठार झाले. याचा निषेध करून फुटीरतावादी गटांनी लाल चौकात सार्वमत मोर्चा नेण्याचे आवाहन केले होते. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी खोऱ्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मोबाईल इंटरनेट सेवा गेल्या महिन्यापासूनच बंद आहे. मात्र, भारत संचार निगमची (बीएसएनएल) पोस्टपेड सेवा व ब्रॉडबॅंड सेवा सुरळीत सुरू आहे. शुक्रवारी दुपारपासून सर्व खासगी कंपन्यांची इंटरनेट सेवा अधिकाऱ्यांनी खंडित केली आहे. "सीएनएस इंटरनेट प्रायव्हेट लिमिटेड‘ या कंपनीची सेवाही बंद झाल्याने श्रीनगरमधील बहुतेक सर्व प्रसिद्धीमाध्यमांसमोर अडचण निर्माण झाली आहे. इंटरनेट सेवा मंगळवारपर्यंत (ता. 16) बंद राहणार असल्याचे "सीएनएस‘च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

काश्‍मीरमध्ये स्थानिक केबल वाहिन्यांचे प्रसारणही 2010 पासून बंदच आहे. मात्र, जम्मूत दोन स्थानिक केबल वाहिन्या सुरू असून, त्याद्वारे बातम्यांचे प्रसारण केले जाते. वणीच्या मृत्यूनंतर बीएसएनएलव्यतिरिक्त अन्य मोबाईल कंपन्यांची प्रीपेड सेवा खंडित केलेली आहे. बीएसएनएलच्या प्री-पेडधारकांच्या फोनवरही केवळ इनकमिंग सेवा उपलब्ध आहे. 14 जुलैपासून "बीएसएनएल‘ सोडून अन्य कंपन्यांची पोस्टपेड सेवा बंद करण्यात आली होती. मात्र, काश्‍मीरबाहेरील विद्यार्थी व व्यावसायिकांकडून आक्षेप नोंदविल्यानंतर अन्य कंपन्यांची पोस्टपेड सेवा 28 जुलैपासून सुरू करण्यात आली. सोशल मीडियातून अफवा मोठ्या प्रमाणावर पसरण्याची भीती असल्याने मोबाईल इंटरनेट सेवा मात्र बंद ठेवण्यात आली आहे. याचा फटका पत्रकार व प्रसिद्धी माध्यमांतील कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी, व्यावसायिक व डॉक्‍टरांना बसला आहे.

Web Title: Kashmir mobile service off the second day