काश्‍मीर हे "मोठे युद्ध': भारतीय अधिकारी

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 डिसेंबर 2016

नागरोटा येथे महिला व लहान मुलांचे संरक्षण करण्याच्या उद्देशार्थ दोन अधिकाऱ्यांनी गोळीबार आपल्या अंगावर घेतला. सुरक्षित ठिकाणी बसून टीका करण्यापेक्षा याचा आदर करावयास शिकले पाहिजे. कोणत्याही विश्‍लेषणाशिवाय हे सुरक्षा व्यवस्थेचे अपयश असल्याचा निष्कर्ष काढण्यामधून जवानांच्या कार्याची महती कमी होते आहे

नवी दिल्ली - काश्‍मीर हे "मोठे युद्ध' असून त्यासाठी दीर्घकालीन धोरणाची आवश्‍यकता असल्याचे मत भारतीय लष्कराचे उत्तर मुख्यालयाचे कमांडर लेफ्टनंट जनरल डीएस हुडा यांनी व्यक्त केले आहे. हुडा हे आज (गुरुवार) निवृत्त होत आहेत. काश्‍मीरमध्ये गेल्या काही महिन्यांत भडकलेल्या रक्तरंजित संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर हुडा यांनी व्यक्त केलेले हे मत अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.

राज्यातील नागरोटा येथे नुकत्याच घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे सात जवान व अधिकारी हुतात्मा झाले आहेत. नागरोटा येथे घडविण्यात आलेला हल्ला हे सुरक्षा व्यवस्थेचे अपयश असल्याची टीका करणाऱ्यांचाही हुडा यांनी समाचार घेतला. टीका करणाऱ्यांना लष्कर लढत असलेल्या लढाईची जराशीही कल्पना नसल्याची टीका त्यांनी केली.

"नागरोटा येथील हल्ला आम्ही टाळू शकलो असतो; तर चांगलेच झाले असते. मात्र काही धक्के सहन करावयास हवेत. आणि आम्ही यातून धडा शिकलो आहोत. याच एका हल्ल्याने राष्ट्रीय सुरक्षेचा मार्ग निश्‍चित करण्याऐवजी पुढे मार्गक्रमण करणे आवश्‍यक आहे. आम्हाला याची जाणीव सर्वाधिक आहे, कारण आमचे आयुष्य यावर अवलंबून आहे,'' असे हुडा म्हणाले.

"नागरोटा येथे महिला व लहान मुलांचे संरक्षण करण्याच्या उद्देशार्थ दोन अधिकाऱ्यांनी गोळीबार आपल्या अंगावर घेतला. सुरक्षित ठिकाणी बसून टीका करण्यापेक्षा याचा आदर करावयास शिकले पाहिजे. कोणत्याही विश्‍लेषणाशिवाय हे सुरक्षा व्यवस्थेचे अपयश असल्याचा निष्कर्ष काढण्यामधून जवानांच्या कार्याची महती कमी होते आहे. नागरोटा येथे घुसलेल्या दहशतवाद्यांना त्वरित ठार करण्यात लष्करास यश आले. नाहीत उरीपेक्षा जास्त जीवितहानी होण्याची शक्‍यता होती,'' असे हुडा यांनी स्पष्ट केले.

Web Title: Kashmir will be a ‘long war’