कथुआ प्रकरण आरोपींना पंजाबमध्ये आणण्याचे आदेश 

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 जुलै 2018

सर्वोच्च न्यायालयाने आज कथुआ बलात्कार आणि खूनप्रकरणातील आरोपींना जम्मू-काश्‍मीरमधील कथुआ येथील तुरुंगातून पंजाबमधील गुरुदासपूर येथील तुरुंगात आणण्याचे आदेश दिले; तसेच याप्रकरणी आठ आठवड्यांमध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिले. 
 

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज कथुआ बलात्कार आणि खूनप्रकरणातील आरोपींना जम्मू-काश्‍मीरमधील कथुआ येथील तुरुंगातून पंजाबमधील गुरुदासपूर येथील तुरुंगात आणण्याचे आदेश दिले; तसेच याप्रकरणी आठ आठवड्यांमध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याचे आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिले. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाची सुनावणी काश्‍मीरबाहेर हलवून पठाणकोटमधील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये सुरू आहे. येथील न्यायालयाच्या आदेशावर समाधानी नसल्यास पंजाब आणि हरियाना उच्च न्यायालयात दाद मागण्याचे स्वातंत्र्यही सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूंना दिले. प्रकरणाची सुनावणी बंद खोलीतच होणार असून आरोपींची ने-आण करण्याचा वेळ वाचावा, यासाठी त्यांना गुरुदासपूरमधील तुरुंगातच ठेवावे, असे न्यायालयाने सांगितले. या प्रकरणाशी संबंधित न्यायाधीश आणि सरकारी वकिलांना पुरेशी सुरक्षा पुरविण्याच्या सूचना न्यायालयाने या वेळी पोलिसांना दिल्या. आरोपीच्या नातेवाईकांना त्यांची भेट घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. 

दरम्यान, पठाणकोट येथील न्यायालयात सुनावणी सुरू असताना एका आरोपीच्या वकीलांनी, काश्‍मीरमध्ये तुरुंगात असताना आरोपींवर अत्याचार झाल्याची तक्रार न्यायालयात केली. न्यायालयाने ही तक्रार जम्मू-काश्‍मीरच्या पोलिस महासंचालकांकडे पाठविली आहे. 

Web Title: Kathua Accused Will Be Transferred To Punjabs Gurdaspur Jail