कथुआ प्रकरण ; आरोपींची याचिकेवर सुनावणी होणार

पीटीआय
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

पीडित मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेला प्रतिवादी म्हणून आरोपींच्या याचिकेची सुनावणी घेतली जाईल, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने सांगितले.

नवी दिल्ली : कथुआ बलात्कार प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे द्यावा, अशी या प्रकरणातील दोन आरोपींनी केलेली विनंती याचिका सुनावणीस घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली आहे. या प्रकरणातील आरोपी सांजीराम आणि विशाल जनगोत्र यांनी ही याचिका दाखल केली होती. 

पीडित मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेला प्रतिवादी म्हणून आरोपींच्या याचिकेची सुनावणी घेतली जाईल, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने सांगितले.

बलात्काराच्या घटनेनंतर आपल्या कुटुंबीयांच्या, मित्रांच्या आणि वकिलांच्या जीवितास धोका असल्याचा दावा करीत पीडित मुलीच्या वडिलांनी प्रकरणाची सुनावणी काश्‍मीरबाहेर, प्राधान्याने चंडीगड येथे घ्यावी, अशी विनंती याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. आरोपींनी मात्र सुनावणी जम्मूमध्येच घ्यावी, तपास मात्र "सीबीआय'कडे सोपवावा, अशी याचिका केली आहे. 

"सुनावणी निष्पक्ष व्हावी' 

कथुआ प्रकरणाची सुनावणी निष्पक्ष आणि न्याय्य वातावरणात व्हावी, हीच खरी काळजी असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. कथुआतील बार कौन्सिलने गुन्हे शाखेला आरोपपत्र दाखल करण्यात अथवा पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या वकिलांच्या कामकाजात कोणताही अडथळा आणला नसल्याचे बार कौन्सिल ऑफ इंडियाने न्यायालयात सांगितल्यावर खंडपीठाने ही प्रतिक्रिया दिली.

तसेच, सुनावणीसाठी वातावरण योग्य नसल्याची थोडी जरी शंका आली, तर प्रकरण दुसऱ्या न्यायालयाकडे वर्ग केले जाईल, असा इशाराही न्यायालयाने दिला. 

Web Title: Kathua Rape Accused Petition will Hearing Soon