घुसखोरीचा डाव कथुआत उधळला

पीटीआय
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

राजौरीमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंग

राजौरीमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंग
जम्मू - पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांच्या काश्‍मीर खोऱ्यातील भारतविरोधी कारवाया सुरूच आहेत. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी आज कथुआ जिल्ह्यामध्ये सहा दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव उधळून लावला, तर राजौरीमध्ये पाकिस्तानच्या सैनिकांनी शस्त्रसंधीचा भंग केला. या वेळी दहशतवादी आणि जवान यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांकडून रॉकेटचा वापर करण्यात आला, अशी माहिती लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. चार ते सहा दहशतवाद्यांनी सीमावर्ती भागातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. या वेळी दहशतवाद्यांनी जवानांच्या वाहनांवर बेछूट गोळीबारदेखील केला. या वाहनांमधून भारतीय लष्कराचे जवान गस्त घालण्याचे काम करत होते. या वेळी दहशतवाद्यांच्या गोळीबारास लष्कराच्या जवानांनीदेखील जशास तसे प्रत्युत्तर दिले, यामध्ये एक दहशतवादी ठार झाल्याचे समजते. लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमधील ही चकमक जवळपास 20 मिनिटे सुरू होते. या वेळी चौक्‍यावर तैनात असणाऱ्या लष्कराच्या अन्य जवानांनीदेखील गस्त घालणाऱ्या जवानांना मदत केली. या चकमकीमध्ये एक दहशतवादी ठार झाल्याचे बोलले जाते.

शस्त्रसंधीचा भंग
पाकिस्तानच्या लष्कराने आज राजौरीमध्ये भारतीय छावण्यांना लक्ष्य करत तोफगोळ्यांचा मारा केला, याला भारतीय लष्करानेही सडेतोड उत्तर दिले. ही चकमक जवळपास पंधरा तास चालल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रात्रभर पाकिस्तानी लष्कराचा तोफगोळ्यांचा मारा सुरू होता, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. भारताने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर आतापर्यंत 30 वेळा पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.

काश्‍मीरमधील अशांतता कायम
काश्‍मीर खोऱ्यातील अशांतता अद्याप कायम असून, आज सलग 104 व्या दिवशी काही तुरळक भाग वगळता अन्य भागांतील जनजीवन विस्कळित झाले होते. फुटीरतावाद्यांनी त्यांच्या बंदची मुदत 27 आक्‍टोबरपर्यंत वाढविली आहे. लाल चौक आणि अन्य भागांतील वाहतूक पूर्ववत झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. लाल चौकामध्ये आज अनेक दुकानदारांनी त्यांची दुकाने उघडली होती, त्यामुळे स्थानिकांना दिलासा मिळाला.

Web Title: Kathua sang infiltration game