मुख्यमंत्र्यांच्या जन्मगावी प्रत्येक कुटुंबाला मिळणार दहा लाख रुपये

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 जुलै 2019

चिंतामडाका हे के. चंद्रशेखर राव यांचे जन्मगाव आहे. येथे काल (सोमवार) झालेल्या एका कार्यक्रमात राव यांनी ही घोषणा केली. या गावात दोन हजार कुटुंबे आहेत. स्वयंरोजगार करण्यासाठी या सर्व कुटुंबांना मदत केली जाणार असल्याचेही ते म्हणाले. 

हैदराबाद : स्वत:च्या जन्मगावावर विविध घोषणांचा वर्षाव करत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी गावातील प्रत्येक कुटुंबाला दहा लाख रुपये दिले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. विरोधकांनी या निर्णयावर टीकास्त्र सोडले आहे. 

चिंतामडाका हे के. चंद्रशेखर राव यांचे जन्मगाव आहे. येथे काल (सोमवार) झालेल्या एका कार्यक्रमात राव यांनी ही घोषणा केली. या गावात दोन हजार कुटुंबे आहेत. स्वयंरोजगार करण्यासाठी या सर्व कुटुंबांना मदत केली जाणार असल्याचेही ते म्हणाले. 

त्यांच्या गावातील तरुणांना स्वयंरोजगारासाठी लागेल ती मदत करण्याचे आदेशही राव यांनी प्रशासनाला दिले आहेत. किंबहुना, रोजगारासाठी गाव सोडून इतरत्र गेलेल्या कुटुंबांनाही पुन्हा गावात येण्याचे निमंत्रण द्यावे, असेही आवाहन राव यांनी गावकऱ्यांना केले आहे. या कुटुंबांनाही राव यांच्या घोषणेचे सर्व फायदे घेता येणार आहेत. 

राव यांच्या या घोषणेमुळे राज्याच्या तिजोरीवर अंदाजे 400 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. प्रत्येक कुटुंबाला दहा लाख रुपये देण्याच्या घोषणेमुळे 200 कोटी, तर गावामध्ये पक्की घरे बांधणे आणि इतर विकासात्मक प्रकल्पांसाठी 200 कोटी रुपये खर्च होणार आहेत. 'माझा जन्म या गावात झाला आहे. त्यामुळे या गावाचे कायम माझ्यावर ऋण आहे. त्यामुळे या मदतनिधीला मी तातडीने मंजुरी देत आहे', असे राव म्हणाले. 

'केवळ एकाच गावावर सरकारची मेहेरबानी का', असा प्रश्‍न भाजपने उपस्थित करत 'या प्रकारची मदत संपूर्ण राज्याला मिळावी', अशीही मागणी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: KCR announces Rs 10 Lakh aid to families in his Native Village