केजरीवालांचे पुन्हा केंद्रावर टीकास्त्र

पीटीआय
बुधवार, 17 मे 2017

नव्या दोन मंत्र्यांच्या नियुक्तीसंदर्भातील फायली केंद्र सरकारने मागील दहा दिवसांपासून अडवून ठेवल्या आहेत. त्यामुळे दिल्ली सरकारची अनेक कामे खोळंबली आहेत. माझ्या विरोधातील शत्रुत्वाचा बदला दिल्लीतील जनतेवर घेऊ नका

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पुन्हा केंद्र सरकारवर निशाणा साधला. आपल्या मंत्रिमंडळातील दोन नव्या मंत्र्यांच्या नियुक्तीसंदर्भातील फायली केंद्र सरकारने अडवून धरल्या असून, त्याचा परिणाम दिल्ली सरकारच्या कारभारावर होत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी आज "ट्‌विटर'च्या माध्यमातून केला.

नव्या मंत्र्यांच्या नियुक्तीच्या दोन फायली अडवून केंद्र सरकारने दिल्लीतील जनतेची अडवणूक सुरू केली असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला.

"दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारबरोबर केंद्रातील भाजप सरकार शत्रुत्वाने वागत आहे. नव्या दोन मंत्र्यांच्या नियुक्तीसंदर्भातील फायली केंद्र सरकारने मागील दहा दिवसांपासून अडवून ठेवल्या आहेत. त्यामुळे दिल्ली सरकारची अनेक कामे खोळंबली आहेत. माझ्या विरोधातील शत्रुत्वाचा बदला दिल्लीतील जनतेवर घेऊ नका,'' असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही "ट्‌विटर'च्या माध्यमातून केंद्रातील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील कपिल मिश्रा यांना डच्चू दिल्यानंतर त्यांची जागा रिक्त आहे. तसेच, दुसरे मंत्री संदीप कुमार यांनाही यापूर्वीच पदावरून हटविण्यात आले होते. मिश्रा यांच्याकडे जल, पर्यटन, कला व संस्कृती या विभागांची जबाबदारी होती; तर कुमार यांच्याकडे सामाजिक न्याय, महिला व बालकल्याण विभागांची जबाबदारी होती.

गृहमंत्रालयाचे मौन कायम
मिश्रा व कुमार यांच्या जागी राजेंद्रपाल गौतम आणि कैलाश गेहलोत यांचा नव्याने मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. मात्र, त्यांच्या नियुक्तीबाबतच्या फायलींवर केंद्रीय गृह मंत्रालयाने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. तसेच, केजरीवाल यांच्या टीकेलाही गृह मंत्रालयाने उत्तर दिलेले नाही.

Web Title: Kejrival criticizes central government again