दिल्ली पोलिस भाजपची एजंट : केजरीवाल

वृत्तसंस्था
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

भाजप आणि एबीव्हीपी यांच्यासाठी दिल्ली पोलिस एजंटप्रमाणे काम करत असून, याचा मी तीव्र निषेध करतो. लोकांचे रक्षण करणे हे पोलिसांचे कर्तव्य असून, एबीव्हीपी आणि भाजपला गुंडागिरी न करू देणे हेही त्यांचे काम आहे

नवी दिल्ली - दिल्ली पोलिस ही भाजपची एजंट झाल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. दिल्लीतील रामजस महाविद्यालयात झालेल्या संघर्षाबाबत दिल्ली पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेनंतर केजरीवाल यांनी हा आरोप केला असून, याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही तुम्ही भाजपचे कार्यकर्ते म्हणून वागू नका, अशी विनंती केली आहे.

राजमस महाविद्यालयात बुधवारी एबीव्हीपी आणि डाव्या विचारसरणीचे एआयएसए या दोन गटांत धुमश्‍चक्री झाली होती. याबाबत बोलताना केजरीवाल म्हणाले, भाजप आणि एबीव्हीपी यांच्यासाठी दिल्ली पोलिस एजंटप्रमाणे काम करत असून, याचा मी तीव्र निषेध करतो. लोकांचे रक्षण करणे हे पोलिसांचे कर्तव्य असून, एबीव्हीपी आणि भाजपला गुंडागिरी न करू देणे हेही त्यांचे काम असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दिल्ली पोलिस पंतप्रधानांना अहवाल देत असले तरी पंतप्रधान हे काही लोकांचे नसून ते या देशाचे पंतप्रधान आहेत हे त्यांनी विसरू नये आणि त्यांनी आपली कर्तव्ये पार पाडावीत, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Kejriwal again slams delhi police