"सर्जिकल स्ट्राईक'चा पुरावा मागणे चुकले:कुमार विश्‍वास

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

आपमध्ये "पक्षांर्गत लोकशाही'चा असलेला अभाव व मतदारांचा पक्षावरुन उडालेला विश्‍वास ही अन्य कारणेही या पराभवास जबाबदार असल्याचे निरीक्षण विश्‍वास यांनी एका मुलाखतीदरम्यान नोंदविले

नवी दिल्ली - दिल्ली महानगरपालिकांत आम आदमी पक्षाच्या (आप) झालेल्या निराशाजनक पराभवाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. "आपचे सर्वोच्च नेते व दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली टीका; आणि भारताकडून पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये करण्यात आलेला "सर्जिकल स्ट्राईक'वर घेतलेली शंका,' या दोन्ही गोष्टी करावयास नको होत्या, असे मत आपचे अन्य एक महत्त्वपूर्ण नेते कुमार विश्‍वास यांनी व्यक्त केले आहे.

याचबरोबर, आपमध्ये "पक्षांर्गत लोकशाही'चा असलेला अभाव व मतदारांचा पक्षावरुन उडालेला विश्‍वास ही अन्य कारणेही या पराभवास जबाबदार असल्याचे निरीक्षण विश्‍वास यांनी एका मुलाखतीदरम्यान नोंदविले.

केजरीवाल यांनी 2015 मध्ये दिल्ली राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून मोदी यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. याचबरोबर, गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये भारतीय लष्कराकडून पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या "सर्जिकल स्ट्राईक'चा पुरावाही केजरीवाल यांनी मागितला होता. या पार्श्‍वभूमीवर, विश्‍वास यांनी व्यक्त केलेले मत अत्यंत महत्त्वपूर्ण मानण्यात येत आहे.

दिल्ली महानगरपालिकांमधील पराभवाचे खाप आपकडून "ईव्हीएम' यंत्रांवरही फोडण्यात आले होते. मात्र पक्षामधील काही नेत्यांनी पराभवाचा दोष ईव्हीएमला देणे योग्य नसल्यचे मत व्यक्त केले आहे. या पार्श्‍वभूमीवर, या पराभवामुळे आपमधील पक्षांतर्गत संघर्ष उफाळून येण्याची दाट शक्‍यता आहे.

Web Title: Kejriwal should not have asked for surgical strikes' proof