बादल सरकारने पंजाबला लुटले - केजरीवाल

पीटीआय
बुधवार, 18 जानेवारी 2017

अकाली दल पंजाबच्या मूळावर उठले असून इतिहासात पहिल्यांदाच त्यांना कडवी लढत द्यावी लागणार असल्याने त्यांची भीतीने गाळण उडाली असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

चंडीगड - सत्ताधारी बादल सरकारने पंजाबला पुरते लुटले असून आगामी विधानसभा निवडणुकीनंतर आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेत आल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमधील जनतेला दिले. "आप'ला दूर ठेवण्यासाठी कॉंग्रेस व अकाली दलात छुपी युती झाल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.

केजरीवाल म्हणाले, ""बादल यांना शिक्षा होणे पुरेसे नाही, तर जनतेने त्यांना या निवडणुकीत पूर्णपणे धूळ चारावी, की जेणेकरून त्यांची अपवित्र पावले पुन्हा विधानसभेत पडता कामा नयेत. "आप'ने त्यांच्याविरोधात सक्षम उमेदवार दिले असून जनतेने त्यांना साथ द्यावी. सत्ता येताच विक्रमसिंग मजिठिया यांसारख्या व्यक्ती तुरुंगाआड दिसतील. "आप'ला सत्ता मिळाली तर आपण पंजाबच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर राहू.''

एसवायएल कॅनॉलच्या प्रकरणी राजकारण होत असून हा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळण्याची गरज आहे. अकाली दल पंजाबच्या मूळावर उठले असून इतिहासात पहिल्यांदाच त्यांना कडवी लढत द्यावी लागणार असल्याने त्यांची भीतीने गाळण उडाली असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

पडद्यामागे बादल, अमरिंदर एकत्र
अमरिंदरसिंग व प्रकाशसिंग बादल यांच्यात संगनमत झाल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. अमरिंदरसिंग हे बादलविरोधी असलेल्या मतांचे विभाजन करण्यासाठी लांबी मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

Web Title: Kejriwal slams badal family