केरळमधील बचावकार्याला वेग ; तिन्ही सेनादले मदतीसाठी सरसावली

पीटीआय
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

पूरग्रस्त चौदा जिल्ह्यांत खाद्यपदार्थांची पाकिटे आणि बाटलीबंद पेयजलही पाठविण्यात आले आहे. मुल्लापेरियार धरणातील पाणीपातळी सातत्याने वाढत असल्याने केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष लवकरच या भागाची हवाई पाहणी करणार आहेत.

नवी दिल्ली : पूरग्रस्त केरळमधील मदत आणि बचावकार्याला वेग आला असून, तिन्ही सेना दले आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानंतर केंद्रीय सचिव पी. के. सिन्हा यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेत राज्यातील मदतकार्याचा आढावा घेतला. लष्कर, हवाई दल आणि नौदलाशिवाय तटरक्षक दल आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या अतिरिक्त तुकड्या पूरग्रस्त भागात तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती गृहमंत्रालयाच्या प्रवक्‍त्याने दिली. 

पूरग्रस्त चौदा जिल्ह्यांत खाद्यपदार्थांची पाकिटे आणि बाटलीबंद पेयजलही पाठविण्यात आले आहे. मुल्लापेरियार धरणातील पाणीपातळी सातत्याने वाढत असल्याने केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष लवकरच या भागाची हवाई पाहणी करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आज केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी विजयन यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज ट्विटरवरून जनतेला मुख्यमंत्री सहायता निधीत सढळ हाताने आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, केरळमध्ये लष्कराची अतिरिक्त कुमक पाठवा अशी विनंतीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. 

दक्षिण रेल्वेलाही फटका 

केरळमधील पुराचा मोठा फटका कोची मेट्रोप्रमाणेच दक्षिण रेल्वेलाही बसला आहे. केरळच्या मध्यवर्ती भागातील रेल्वे वाहतूक पूर्णपणे कोलमडून पडली आहे. कोची मेट्रोच्या फेऱ्या आज सकाळपासूनच बंद करण्यात आल्या आहेत. राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने पुढाकार घेतला असून, पक्षाने लोकांनाही मुख्यमंत्री सहायता निधीत आपल्यापरीने योगदान देण्याचे आवाहन केले आहे. 

जलमय देवभूमीत 

"एनडीआरएफ'ची बारा पथके रवाना 
हवाईदलाकडून अठरा विमाने तैनात 
आठवडाभरात 73 जण मृत्युमुखी 
अलुवातील प्रसिद्ध शिवमंदिर बुडाले 
मुन्नार, पोनमुडी पर्यटनस्थळी भूस्खलन 
ओडिशाकडून तातडीने 5 कोटींची मदत 

Web Title: Keral Flood Rescue Operations