'टेबलटॉप' आहे कोझिकोडची धावपट्टी; लँडिंगसाठी समजली जाते धोकादायक

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 August 2020

भारतातील सर्वात सुंदर अशा धावपट्ट्यांपैकी एक असलेली ही धावपट्टी लँडिंगसाठी धोकादायक मानली जाते. टेबलटॉप रनवेवर विमान उतरवणं मोठं आव्हान असतं.

कोझिकोड - केरळमध्ये शुक्रवारी रात्री 8 च्या सुमारास एअर इंडियाचं विमान लँडिंगवेळी क्रॅश झालं. धावपट्टीवर विमान घसरल्यानं ही दुर्घटना झाली. दुर्घटनेनंतर विमानाचे दोन तुकडे झाले आहेत. केरळच्या कोझिकोड विमानतळाची ही धावपट्टेटी टेबलटॉप आहे. भारतातील सर्वात सुंदर अशा धावपट्ट्यांपैकी एक असलेली ही धावपट्टी लँडिंगसाठी धोकादायक मानली जाते. डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार एअर इंडिया एक्स्प्रेस एएसबी1344, बोइंग 737 हे विमान दुबईतून कालिकत इथं येत होतं. विमानात 191 प्रवासी होते. लँडिंगवेळी मोठा पाऊस असल्यानं धावपट्टीवर उतरताच विमान घसरले. त्यानंतर विमानाचे दोन तुकडे झाले. 

विमान दुर्घटनेचं कारण धावपट्टी टेबलटॉप असल्याचंही मानलं जातं. भौगोलिक परिस्थितीमुळे कोझिकोड विमानतळ हे टेबलटॉप आहे. धावपट्टीच्या आजुबाजुला डोंगर आणि दऱ्या आहेत. टेबलटॉप धावपट्टीमध्ये रनवे संपल्यानंतर पुढे जागा शिल्लक नसते. त्यामुळे अशा धावपट्टीवर विमान घसरलं तर ते थेट दरीत कोसळण्याची शक्यता असते. कोझिकोड इथंही असंच झालं आणि विमानाचा मोठा अपघात झाला. 

धावपट्टीच्या दोन्ही किंवा एका बाजुला दरी असल्यानं टेबलटॉप रनवेवर विमान उतरवणं मोठं आव्हान असतं. लँडिंग आणि उड्डाण दोन्हीवेळी काळजी घ्यावी लागते. यामुळे पायलटला दक्ष रहावं लागतं. बहुतांश टेबलटॉप रनवे हे पठार किंवा डोंगरमाथ्यावर असतात. भारतात कर्नाटकात मंगळुरूत, केरळमध्ये कोझिकोड आणि मिझोराममध्ये टेबलटॉप धावपट्ट्या आहेत. 

हे वाचा - केरळ विमान दुर्घटना : पायलट कॅप्टन दीपक साठे यांच्यासह 14 जणांचा मृत्यू

कोझिकोड विमानतळावर धावपट्टीवरून घसरलेलं विमान जवळपास 50 फूट खोल दरीत कोसळलं. यामुळेच विमानाचे दोन तुकडे झाले. दुबईहून वंदे भारत मिशन अंतर्गत 191 प्रवासी घेऊन हे विमान भारतात आलं होतं. पायलटसह 14 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. तसंच 15 जण गंभीर असून एकूण 123 जण जखमी झाले आहेत. 

माजी विमान उड्डाण राज्यमंत्री राजीव प्रताप रूडी यांनी सांगितलं की, इथं धावपट्टी जवळपास 9300 फूट इतकी आहे. जर एखाद्या शून्य धावपट्टीवरून पाहिलं तर विमान उतरवण्यासाठी उपलब्ध धावपट्टी 8 हजार फूटांच्या आसपास आहे. पावसाळ्यात अशा ठिकाणी धावपट्टी ओलसर होते. तेव्हा ब्रेक लावताना हायएस्ट ब्रेकिंग केलं जातं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kerala flight crash tabletop runway most beautiful but dangerous