Kerala Flood : शाही विवाहाचे स्वप्नही वाहून गेले! 

ज्ञानेश सावंत 
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

वायनाड, केरळ : वायनाड जिल्ह्यातील मांज्याली गावातील फातिमा ही तरुणी पुढील महिन्यात इब्राहिमसोबत बोहल्यावर चढणार आहे. आपली एकुलती लेक सासरी सुखात राहावी म्हणून फातिमाच्या घरच्यांनी जमविलेले पैसे, सोने, तसेच मौल्यवान वस्तू पुरात वाहून गेल्या आहेत. यामुळे शाही थाटात विवाह करण्याच्या तिच्या स्वप्नावरही पाणी फेरले आहे. 

वायनाड, केरळ : वायनाड जिल्ह्यातील मांज्याली गावातील फातिमा ही तरुणी पुढील महिन्यात इब्राहिमसोबत बोहल्यावर चढणार आहे. आपली एकुलती लेक सासरी सुखात राहावी म्हणून फातिमाच्या घरच्यांनी जमविलेले पैसे, सोने, तसेच मौल्यवान वस्तू पुरात वाहून गेल्या आहेत. यामुळे शाही थाटात विवाह करण्याच्या तिच्या स्वप्नावरही पाणी फेरले आहे. 

फातिमाच्या घरच्यांनी तिचे लग्न शाही थाटात लावून देण्याचे ठरविले होते. यासाठी तिला लग्नात शंभर तोळे सोने (शोरणम), 50 लाख रपये (रुबा) आणि मोटार (वंडी) देण्याचे ठरविले होते. यासाठीची जुळवाजुळव माहेरच्या लोकांनी केली होती, पण पुरामुळे यातील बहुतेक वस्तू, विशेषतः 25 ते 30 तोळे सोने गायब झाले. रोकडही कुठे सापडली नाही. शाही थाटातल्या लग्नाचे फातिमाचे स्वप्नही त्या पुरात वाहून गेल्यात जमा आहे. मुलीच्या शाही सोहळ्याचे नेटके नियोजन फातिमाचे वडील सलीम हे "सकाळ'च्या प्रतिनिधींसमोर मांडत होते. इब्राहिमच्या घरच्यांनीही समजून घेत, पुढील महिन्यातील लग्न सहा महिने पुढे ढकलले आहे खरे, पण फातिमाच्या आई-वडिलांना चिंता आहे, ती पुन्हा एवढे सोने, पैसा कसा जमवायचा याची. 

केरळमध्ये मुस्लिम धर्मीय नोव्हेंबरमध्ये लग्न करीत नाहीत. त्यामुळे पुढील महिन्यात लग्न करण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबीयांनी घेतला होता. इब्राहिम जिल्हा प्रशासनात नोकरी करतो. मात्र, पुराच्या तडाख्यात फातिमा आणि इब्राहिम यांच्या नव्या संसाराच्या वाटचालीचा प्रवास लांबला आहे. या दोघांसारखे अनेक जणांची लग्न पुढे ढकलल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. पुरात केरळवासीयांची घरे, शेती आणि अन्य साधनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. त्याचे परिणाम आता कौटुंबिक सामाजिक घटकांवरही होऊ लागले आहेत. केरळमध्ये विशेषतः मुलींची लग्न दिमाखात करण्याची परंपरा आहे. त्यात, जावयाला सोन्यासह रोख रक्कम, घर किंवा मोकळी जागा देतात. मुलगा सरकारी नोकरी करीत असेल, तर खर्च आणखी वाढतो. 
 
सासरी मुलीला सर्व सुख मिळावे, म्हणून जावई आणि त्यांच्या नातेवाइकांना परंपरेनुसार सोने, रोख रक्कम आणि घर दिले जाते. त्यासाठी सगळ्या गोष्टी देण्याची तयारी केली होती. पूर आला तेव्हा आम्हाला घरातून हलविण्यात आले. घरातील वस्तू मात्र तिथेच राहिल्या. आठ दिवसांनी घरी परत आल्यानंतर एकही वस्तू मिळाली नाही. 
- सलीम, फातिमाचे वडील 

Web Title: #Kerala Flood : Shahi wedding dream drawn in flood