Kerala Floods: युएईतील भारतीयांची केरळ पूरग्रस्तांना मदत

वृत्तसंस्था
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

मूळचे केरळचे असणारे, पण सध्या युएईमध्ये वास्तव्यास असणारे युसूफ अली यांनी 5 कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. फातिमा हेल्थकेअरस समुहाचे अध्यक्ष के. पी. हुसेन यांनीही 5 कोटींची मदत जाहीर केली आहे.

तिरूअनंतपुरम : केरळ राज्यात पावसामुळे हाहाकार माजला असून, देशभरातून केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदतीचे आव्हान केले जात आहे. पेटीएम व अॅमेझॉनद्वारे सर्व देशभरातून केरळमधील नागरिकांना मदत मिळत असतानाच, आता युएई म्हणजेच संयुक्त अरब अमिरातींमधील देशात राहणाऱ्या व मूळ भारतीय असणाऱ्या व्यापाऱ्यांनीही केरळ पूरग्रस्तांना भरघोस मदत केली आहे.

युएईतील मूळ भारतीय असलेल्या व्यापारी व उद्योगपतींनी 12.5 कोटी रूपये मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे. युएईमध्ये 26 लाख भारतीय असून, तेथे भारतीयांचे प्रमाण 30 टक्के आहे. मूळचे केरळचे असणारे, पण सध्या युएईमध्ये वास्तव्यास असणारे युसूफ अली यांनी 5 कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. फातिमा हेल्थकेअरस समुहाचे अध्यक्ष के. पी. हुसेन यांनीही 5 कोटींची मदत जाहीर केली आहे. तसेच हुसेन यांनी सांगितले की, त्यांच्यातर्फे वैद्यकीय मदत पथके पाठवण्यासाठी केरळच्या आरोग्य सचिवांशी चर्चा केली आहे. तसेच युएईचे पंतप्रधान आणि दुबईचे राजे शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तुम यांनी केरळला मदत करण्यासाठी आपत्कालीन समिती तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

केरळमध्ये मागील 2 आठवड्यांपासून मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नागरिक बेघर झाले आहेत. केरळमध्ये बचाव पथके सातत्याने लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. मदतकार्यात अडथळे येत असल्याने अनेक ठिकाणी लोकांना अन्न आणि पाणी मिळणे कठीण झाले आहे. चेंगन्नूर भागात अजूनही 10 हजार लोक अडकून पडले आहेत. एक बहुमजली इमारतीमध्ये अनेक मृतदेह असल्याची माहिती लोकांनी दिली आहे. मात्र, पाणीपातळी ओसरल्यानंतर ते बाहेर काढले जातील, असे सांगितले जात आहे.

बचाव पथके आणि हेलिकॉप्टर्स अन्न पोचविण्याची व्यवस्था करत आहेत. काही भागात मच्छिमारांनीही मदतीसाठी बोटींसह धाव घेतली आहे. पेरियार नदीच्या काठावर अनेक गायी, म्हशी आणि शेळ्या मरून पडल्याचे भयंकर दृश्‍य दिसत आहे. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. इतके दिवस बंद असलेल्या कोची विमानतळावरून आज पहिल्यांदा विमानाचे उड्डाण झाले. 
 

Web Title: kerala floods citizens from UAE helps kerala flood victims