बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या पुरुषाचे महिलेने कापले लिंग

वृत्तसंस्था
शनिवार, 20 मे 2017

एका महिलेने स्वत:च्या संरक्षणासाठी बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या पुरुषाचे लिंग कापण्याचे धाडस दाखविले आहे. या प्रकारात आरोपी पुरुष जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तिरुअनंतरपुरम (केरळ) : एका महिलेने स्वत:च्या संरक्षणासाठी बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या पुरुषाचे लिंग कापण्याचे धाडस दाखविले आहे. या प्रकारात आरोपी पुरुष जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शुक्रवारी रात्री तिरुअनंतपुरममधील पेताह येथे हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पुरुष आणि महिला परस्परांना ओळखत होते. महिलेसह तिच्या कुटुंबियांनाही आरोपी ओळखत होता. पूजेच्या निमित्ताने महिलेच्या घरी त्याचे येणे-जाणे होते. महिलेचे वडिल आजारी असल्याने अंथरुणाला खिळलेले आहेत. त्यामुळे आरोपीने महिलेच्या आईशी मैत्री केली आणि त्यांच्या घरात येणे-जाणे सुरू केले होते. गेल्या दोन दिवसांपासून तो महिलेला त्रास देत होता.

शुक्रवारी तो घरी आला आणि तो बलात्काराचा प्रयत्न करू लागला. महिलेने स्वत:च्या रक्षणासाठी धारदार चाकूने त्याचे लिंग कापले. गंभीर जखमी झाल्याने आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती ठीक असल्याचे रुग्णालयाने सांगितले आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करून घेतली असून महिलेविरुद्ध तक्रार दाखल केलेली नाही.

Web Title: Kerala: Woman cuts off man's genitals for trying to rape her