kerla floods: केरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर असून, युद्धपातळीवर मदतकार्य राबविले जात आहे. प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कुट्टनाड आणि अलेप्पी या जिल्ह्यांमधून शनिवारी आणि रविवारी सुमारे 2.5 लाख लोकांना सुरक्षितस्थळी पोचविण्यात आले असून, जवळपास 9 लाख लोकांनी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. 

तिरुअनंतपूरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर असून, युद्धपातळीवर मदतकार्य राबविले जात आहे. प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कुट्टनाड आणि अलेप्पी या जिल्ह्यांमधून शनिवारी आणि रविवारी सुमारे 2.5 लाख लोकांना सुरक्षितस्थळी पोचविण्यात आले असून, जवळपास 9 लाख लोकांनी मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. 

कुट्टनाड आणि अलेप्पी या दोन्ही जिल्ह्यांमधील पाण्याची पातळी अजूनही कमी झालेली नाही. जिल्हा प्रशासनाने 97 टक्के लोकांना अलाप्पुझालामधील मदत छावण्यांमध्ये आणण्यात आले असल्याचा दावा केला आहे. मुख्य शहर अजूनही पाण्याखाली आहे. परिसरातील घरे पाण्यानी भरलेली आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, सुमारे तीन लाख लोक प्रभावित झाली असून, राज्यातील विविध शिबिरांमध्ये 9 लाख लोक आहेत. कुट्टनाडमधील लोकांच्या बचावासाठी अलाप्पुझामधून 60 बोटी जप्त करण्यात आल्या आहेत. 

बचाव पथके सातत्याने लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. मदतकार्यात अडथळे येत असल्यामुळे अनेक ठिकाणी लोकांना अन्न आणि पाणी मिळणे कठीण झाले आहे. चेंगन्नूर भागात अजूनही 10 हजार लोक अडकून पडले आहेत. एक बहुमजली इमारतीमध्ये अनेक मृतदेह असल्याची माहिती लोकांनी दिली आहे. मात्र, पाणीपातळी ओसरल्यानंतर ते बाहेर काढले जातील, असे सांगितले जात आहे. बचाव पथके आणि हेलिकॉप्टर्स अन्न पोचविण्याची व्यवस्था करत आहेत. काही भागात मच्छिमारांनीही मदतीसाठी बोटींसह धाव घेतली आहे. पेरियार नदीच्या काठावर अनेक गायी, म्हैशी आणि शेळ्या मरून पडल्याचे भयंकर दृश्‍य दिसत आहे. पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. 

राष्ट्रपतींनी घेतला आढावा 
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केरळमधील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज राज्यपाल पी. सदाशिवम आणि मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रपती भवनने ट्‌विट करून म्हटले आहे, की राष्ट्रपतींनी अडचणींचा सामना करणाऱ्या केरळच्या लोकांची क्षमता आणि धैर्याची स्तुती केली. त्यांनी राज्यातील जनतेला विश्‍वास दिला, की संपूर्ण देश त्यांच्याबरोबर आहे. 

पुराचे संकट... 
- हजारो लोक अजूनही सुरक्षितस्थळी पोचण्याच्या प्रतीक्षेत 
- गेल्या दहा दिवसांत 197 जण मृत्युमुखी 
- उत्तर प्रदेश सरकारकडून 15 कोटींचे बचाव साहित्य आणि औषधे 
- पश्‍चिम बंगाल सरकारकडून दहा कोटींची मदत 
- 20 हजार कोटींच्या नुकसानीचा असोचॅमचा अंदाज 

Web Title: kerla flodds Strongly Help in Kerala