काँग्रेसची 'खुशबू' आता भाजपच्या कमळाला

वृत्तसंस्था
Monday, 12 October 2020

फिल्मी दुनियेतून राजकारणात सक्रिय झालेल्या अभिनेत्री खुशबू सूंदर यांनी सोमवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काही तासांतच भाजपमध्ये प्रवेश केला आहे

नवी दिल्ली- फिल्मी दुनियेतून राजकारणात सक्रिय झालेल्या अभिनेत्री खुशबू सूंदर यांनी सोमवारी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर काही तासातच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. खुशबू या 2014 मध्ये काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या होत्या. 2018 मध्ये तेलंगणा विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना स्टार प्रचारकाचे स्थान दिले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचा धडाक्यात प्रचार केला होता.

खुशबू यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांना काँग्रेस प्रवक्तेपदावरुन हटवण्यात आले. त्यांनतर खूशबू या भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यांनी आज दिल्लीमध्ये अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्ष प्रवेशावेळी भाजप नेते संबित पात्रा उपस्थित होते.  

नसानसांत क्रिकेट भिनलेला आकाश विचारतो, "ज्यांच्याकडे लाखो रुपये आहेत...

खुशबू यांनी आपला राजीनामा सोनिया गांधी यांच्याकडे सुपुर्द केला आहे. ज्या लोकांना स्थानिक वात्सवाची काहीही जाणीव नाही, अशा लोकांकडून मला मागे ओढण्याचा प्रयत्न सुरु आहे. काही उच्च पदावर बसलेल्या नेत्यांचा लोकांशी काही संपर्क नाही, ते केवळ आपल्या नियमांनुसार काम करु पाहात आहेत. अशा पक्षात मला प्रामाणिकपणे काम करता येणार नाही, असं खूशबू यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.

खूप विचार केल्यानंतर आणि खूप वेळ दिल्यानंतर मी पक्षाला सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. खुशबू दिल्लीला रवाना झाल्या होत्या. त्या भाजपमध्ये सहभागी झाल्याने तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला फायदा मिळू शकतो. भाजप त्यांना स्टार प्रचारक म्हणून राज्यात उतरवू शकते. खुशबू यांच्यामुळे तामीळनाडूत भाजपबाबतचा दृष्टीकोनात बदल होईल, असा राज्यातील भाजप नेत्यांचा विश्वास आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khushboo Sundar joins Bharatiya Janata Party