मोबाईल चोरीसासाठी मुलांना चक्क "प्रशिक्षण'! 

मोबाईल चोरीसासाठी मुलांना चक्क "प्रशिक्षण'! 

पाटणा : बाल गुन्हेगारांमुळे झारखंडमध्ये एक नवीच समस्या निर्माण झाली आहे. वेगवेगळ्या शहरांत मोबाईल चोरणाऱ्या 300 मुलांना पकडण्यात आले खरे; पण त्यांना कोठे ठेवायचे, असा प्रश्‍न बाल सुधार समितीपुढे निर्माण झाला आहे. समितीने ही समस्या सरकारदरबारी नेली असून, उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. 

मोबाईल चोरणाऱ्या मुलांची संख्या वाढायला लागल्यावर या प्रकाराची चौकशी सुरू झाली, तेव्हा आणखी एक विचित्र बाब सामोरी आली. ती म्हणजे, झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यात मोबाईल चोरीचे चक्क प्रशिक्षण दिले जाते! त्यासाठी तीन वसतिगृहे असून, या वसतिगृहांत येणाऱ्या मुलांची वये आठ ते 14 वर्षे दरम्यान आहेत. 

बाल कल्याण समितीने दिलेल्या माहितीनुसार, या वसतिगृहांतून "प्रशिक्षण' घेऊन बाहेर पडलेल्या मुलांना झारखंडमधील वेगवेगळ्या शहरांत पाठविले जाते. ही मुले अनाथ असल्याने त्यांचा काही ठावठिकाणा नसतो. एक महिला या मुलांना मोबाईल चोरीचे प्रशिक्षण देत असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. साहिबगंज हा जिल्हा बिहार आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांना लागून आहे.

पकडलेल्यांमध्ये झारखंडाबरोबर बिहार आणि पश्‍चिम बंगालमधील मुलेही आहेत. एका टोळीच्या माध्यमातून विविध ठिकाणांहून मुलांना येथे आणले जाते. मोबाईल चोरी "प्रशिक्षण कोर्स'चा कालावधी दहा दिवसांचा असून, तो पूर्ण करण्यास नकार देणाऱ्या मुलांचा छळ केला जातो. प्रसंगी त्यांना उपाशीही ठेवले जाते. पकडलेल्या मुलांनी दिलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी या टोळीच्या शोधार्ध मोहीम सुरू केली आहे. 

कुख्यात जामताडा जिल्हा 

साहिबगंजचा शेजारी जिल्हा आहे जामताडा. हा जिल्हा सायबर गुन्हेगारीचा गड मानला जातो. देशातील कोणत्याही राज्यात घडलेल्या सायबर गुन्ह्यासंदर्भात गुन्हेगारांना पकडण्यासाठी त्या राज्यांचे पोलिस जामताडा जिल्ह्यात आले नाहीत, असा एक दिवसही येथे जात नाही. बॅंक खात्यांतील पैसे हडप करण्याच्या गुन्ह्यात तर जामताडाची कुप्रसिद्धी झाली आहे. एटीएमचे क्‍लोन करण्याचे प्रकारही सामोरे आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com