मोदींचा मास्टरप्लॅन; यांना बोलविणार शपथविधीला

वृत्तसंस्था
बुधवार, 29 मे 2019

ममता बॅनर्जी येणार शपथविधीला
निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर तुफान टीका केल्यानंतरही नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा निर्णय पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. 'राष्ट्रपती, पंतप्रधान या पदांसाठीच्या शपथविधी कार्यक्रमाला सौजन्य म्हणून मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहावे लागते. मी इतरही एक-दोन मुख्यमंत्र्यांशी बोलले असून, या शपथविधीला जाण्याचा निर्णय घेतला आहे,' असे ममता यांनी सांगितले.

नवी दिल्ली : सलग दुसऱ्यांदा घवघवीत मताधिक्‍याने पंतप्रधानपदी विराजमान होणारे नरेंद्र मोदी यांचा उद्या (30 मे) शपथविधी होत असून, त्यांनी पश्चिम बंगालमध्ये पक्षाच्या विस्तारासाठी मास्टरप्लॅन आखला आहे. मोदींनी बंगालमध्ये हिंसाचारात बळी पडलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना शपथविधीचे निमंत्रण दिले आहे.

पश्चिम बंगालमध्ये मागील काही वर्षांत हत्या झालेल्या 51 भाजप कार्यकर्त्यांच्या कुटूंबियांना मोदीं कडून आमंत्रण देण्यात आले आहे. याबरोबरच मध्य प्रदेशातील हत्या झालेल्या चार भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशात भाजपचे सरकार नसून, सहानुभूती म्हणून मोदींकडून हा प्लॅन आखण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील तृणमुलच्या 40 नगरसेवक व दोन आमदारांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता पश्चिम बंगालमध्ये भाजपची ताकद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

गुरुवारी सायंकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात मोदींचा शपथविधी होणार आहे. या शपथविधीसाठी 'बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टिसेक्‍टरल टेक्‍निकल अँड इकोनॉमिक को-ऑपरेशन' (बिम्सटेक) या संघटनेच्या राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण देण्यात आले आहे. पूर्वनियोजित दौरा असलेल्या बांगलादेशच्या अध्यक्षा शेख हसीना वगळता उर्वरित अध्यक्ष यानिमित्ताने दिल्लीत येतील. याशिवाय, शांघाय सहकार्य परिषद (एससीओ) व किर्गिझस्तान व मॉरिशसचे प्रमुखही या सोहळ्यास येणार आहेत. मोदींनी 2014 मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतली तेव्हा पाकिस्तानसह 'सार्क' देशांच्या प्रमुखांना बोलाविण्यात आले होते. यंदा पाकिस्तानच्या पंतप्रधानांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. 'बिमस्टेक' म्हणजे बंगालच्या उपसागराच्या परिसरातील देशांची आर्थिक व तांत्रिक सहकार्य संघटना आहे. भारतासह बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका व आग्नेय आशियातील म्यानमार व थायलंड हे देश या संघटनेचे सदस्य आहेत. याचे मुख्यालय ढाक्‍यात आहे. 

ममता बॅनर्जी येणार शपथविधीला
निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर तुफान टीका केल्यानंतरही नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा निर्णय पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतला आहे. 'राष्ट्रपती, पंतप्रधान या पदांसाठीच्या शपथविधी कार्यक्रमाला सौजन्य म्हणून मुख्यमंत्र्यांना उपस्थित राहावे लागते. मी इतरही एक-दोन मुख्यमंत्र्यांशी बोलले असून, या शपथविधीला जाण्याचा निर्णय घेतला आहे,' असे ममता यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kin of victims of Bengal political violence invited to PM Narendra Modis swearing in