किसान शेतमजूर काँग्रेसचा 23 रोजी संसदेला घेराव : नाना पटोले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कथित शेतकरी विरोधी धोरणाचा जाब विचारण्यासाठी येत्या मंगळवारी (ता. 23) संसदेला घेराव घालण्याची घोषणा अखिल भारतीय किसान शेतमजूर कॉंग्रेसने आज दिल्लीत केली. यात निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसह पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेशातील शेतकरी संघटना सहभागी होतील. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासने पाहता शेतकऱ्यांना गेल्या चार वर्षांत काय मिळाले आणि शेतकऱ्यांकडून सरकारने काय घेतले याचा जाब सत्ताधाऱ्यांना विचारला जाईल, असे अखिल भारतीय किसान शेतमजूर कॉंग्रसचे प्रमुख नाना पटोले यांनी सांगितले. भाजप आणि लोकसभा खासदारकी सोडून कॉंग्रेसमध्ये परतल्यानंतर पटोले यांच्याकडे पक्षाध्यक्ष राहुल गांधींनी अलीकडेच किसान शेतमजूर संघटनेचे प्रमुखपद सोपविले होते. 

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, न मिळालेली कर्जमाफी, डिझेल आणि खतांचे चढे दर, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीला लावलेल्या वाटाण्याच्या अक्षता, ऊस उत्पादकांची थकबाकी या मुद्द्यांवर सरकारला जाब विचारण्यासाठी जंतर- मंतरवर होणाऱ्या या आंदोलनात देशभरातील चाळीस शेतकरी संघटना सहभागी होणार आहेत. कॉंग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारीही आंदोलनात भाग घेतील. मात्र, पक्षाध्यक्ष राहुल गांधींचा सहभाग अद्याप निश्‍चित होऊ शकला नसल्याचे पटोले यांनी सांगितले.

अर्थात, यात महाराष्ट्रातील खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, आमदार बच्चू कडू यांची प्रहार शेतकरी संघटना यांचाही सहभाग नाही. मात्र, 30 नोव्हेंबरला दिल्लीत सर्व समविचारी शेतकरी संघटनांचे संयुक्त आंदोलन होणार असल्याचेही पटोले म्हणाले.  
 
Web Title: Kisan farming Congress encircles Parliament on 23 says Nana Patole