कोण आहेत कुलभूषण जाधव?

कोण आहेत कुलभूषण जाधव?

गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये कुलभूषण जाधव या भारतीय कथित गुप्तहेराला पाकिस्तानने अटक केली आणि तब्बल तीन आठवडे ही बातमी गोपनीय ठेवली. 3 मार्च 2016 च्या अटकेनंतर 26 मार्च 2016 रोजी पहिल्यांदा पाकिस्तानी माध्यमात या अटकेला वाचा फुटली, ती पाकिस्तानी चौकशी अधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या एका व्हिडिओमुळे. भारताची रिसर्च अँड ऍनॅलिसिस विंग (रॉ) आणि पाकिस्तानची इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) यांच्यामार्फत परस्परांच्या देशामध्ये सुरू असलेल्या गोपनीय कारवायांची चर्चा कुलभूषण यांच्या अटकेनंतर आणि व्हिडिओमुळे जगभर झाली. 

"आयएसआय'च्या प्रसिद्धी विभागाच्या दाव्यानुसार, बलुचिस्तानातील मश्‍केल येथे कुलभूषण यांना अटक करण्यात आली. "पाकिस्तानात गोपनीय कारवाया करणे आणि घातपात घडवून आणणे,' या आरोपांखाली कुलभूषण यांच्यावर अटकेची कारवाई झाली. 26 मार्च 2016 रोजी पाकिस्तानच्या गुप्तचर खात्याने जाधव यांचा पासपोर्टही प्रसिद्धी माध्यमांपर्यंत पोचवला. त्या पासपोर्टवर हुसेन मुबारक पटेल असे नाव आहे. पासपोर्टवरील फोटो कुलभूषण यांचा होता. ठाणे विभागीय पासपोर्ट कार्यालयाने 12 मे 2014 रोजी हा पासपोर्ट जारी केल्याचा उल्लेख आहे. पासपोर्टवरील माहितीनुसार, पटेल यांचे मूळ गाव सांगली होते. 

पाकिस्तानने "रॉ' एजंट पकडल्याची माहिती टीव्ही चॅनेल्सवर सुरू झाल्यावर कुलभूषण यांचे काका सुभाष जाधव यांनी पासपोर्टवरील फोटो ओळखला आणि हा फोटो कुलभूषण जाधव यांचा असल्याची माहिती भारतीय प्रसार माध्यमांना दिली. सुभाष जाधव मुंबईचे निवृत्त पोलिस उपायुक्त आहेत. कुलभूषण यांच्या वडिलांचे नाव सुधीर आहे आणि जाधव कुटुंब मुंबईत पोवईजवळील सिल्व्हर ओक सोसायटीत राहते, अशी माहितीही वर्षभरापूर्वी समोर आली. कुलभूषण भारतीय नौदलात कमांडर होते आणि त्यांनी सेवानिवृत्ती घेतली असल्याचेही याच काळात प्रसिद्ध झाले. भारतीय गुप्तचर खात्यातील ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कुलभूषण 2003 पासून पाकिस्तानात काम करत होते. अधिकाऱ्यांच्या मते, जाधव कुटुंबीयांशी फोनवर मराठीत बोलत असत आणि त्यामुळेच त्यांच्याकडे पाकिस्तानी गुप्तचर खात्याचे लक्ष वेधले गेले असावे. 

भारताने फेटाळले आरोप

कुलभूषण यांना इराणमधून पळवून नेले होते, असा दावा भारताने सातत्याने केला. जुलै 2016 मधील पत्रकार परिषदेत भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्‍त्याने सांगितले, की कुलभूषण यांना इराणमधून कोणत्या परिस्थितीत पळवून नेले, याबद्दल संभ्रम आहे. भारताने कुलभूषण यांच्याशी संपर्क साधू देण्याची विनंती पाकिस्तानला केली होती. तथापि, ती विनंती मान्य झाली नाही. लोकसभेत परराष्ट्र मंत्रालयाने कुलभूषण यांच्यावर पाकिस्तानने केलेले सर्व आरोप फेटाळले होते.

"रॉ'च्या कठोर नियमांनुसार, कुलभूषण जाधव नेमके कोण, कुठले, पाकिस्तानमध्ये ते कसे पोचले ही माहिती कदाचित कधीच उघड होणार नाही. मात्र, त्यांची फाशीची शिक्षा रोखली जावी, यासाठी भारत सरकारला पाकिस्तानवर मोठा दबाव आणावा लागणार आहे, हे निश्‍चित.

जाधव यांना फाशी न्यायानेच : पाक माध्यमे

रावळपिंडी : कुलभूषण जाधव यांना फाशी देण्याची घोषणा पाकिस्तानकडून करण्यात आल्यानंतर त्याचे पडसाद वेगाने उमटू लागले आहेत. पाकिस्तानी माध्यमांनी जाधव यांना फाशी देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. जाधव यांना फाशी देण्याचा निर्णय "दुर्मिळ' असल्याचे मत "डॉन' या पाकमधील प्रभावी वृत्तपत्राने व्यक्‍त केले आहे. भारत व इतर देशांच्या गुप्तचर संस्थांनाही जाधव यांना झालेल्या फाशीमुळे कठोर संदेश दिला गेल्याचे मत "डॉन'च्या माध्यमातून व्यक्‍त करण्यात आले आहे. "द नेशन' या पाकिस्तानातील अन्य महत्त्वपूर्ण वर्तमानपत्रानेही जाधव यांना देण्यात आलेल्या फाशीमुळे "न्याय' झाल्याचे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com