पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष: पंतप्रधान

वृत्तसंस्था
रविवार, 18 जून 2017

कोची : "गेल्या तीन वर्षांमध्ये केंद्र सरकारने देशातील पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे,' असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. त्यांच्या हस्ते कोची मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले.

कोची : "गेल्या तीन वर्षांमध्ये केंद्र सरकारने देशातील पायाभूत सुविधांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे,' असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. त्यांच्या हस्ते कोची मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले.

मेट्रोच्या लोकार्पणानंतर पंतप्रधान मोदींनी कोचीच्या नागरिकांचे अभिनंदन केले. आपल्या भाषणाची मल्याळी भाषेत सुरवात केल्यानंतर ते म्हणाले, ""आजच्या कार्यक्रमात सहभागी होता आल्याचा मला आनंद आहे. गेल्या तीन वर्षांत पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे. शहराचा आराखडा आखताना नागरिकांना केंद्रस्थानी ठेवण्यासाठी आणि जमिनीचा वाहतुकीसाठी नियोजनबद्ध वापर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. गेल्या काही बैठकांमध्ये वाहतुकीची समस्या मिटवू शकणाऱ्या 175 प्रकल्पांचा आढावा मी घेतला आहे.'' भविष्याचा विचार करूनही पायाभूत सुविधा विकसित केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. कोची मेट्रोमध्ये काम करण्यासाठी एक हजार महिला आणि 23 ट्रान्सजेंडर व्यक्तींची निवड केल्याबद्दलही त्यांनी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

कोची मेट्रो प्रकल्पासाठी केरळ आणि केंद्र सरकारने समान निधी दिला आहे. केंद्र सरकारने प्रकल्पासाठी आतापर्यंत दोन हजार कोटी रुपये दिले आहेत. या मेट्रोचे डबे चेन्नईजवळील अलस्टम येथे तयार केले असून यासाठी वापरलेले 70 टक्के साहित्य भारतीय बनावटीचे आहे. पंतप्रधान मोदी यांनी या मेट्रोमधून प्रवासही केला. या मेट्रोसाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान अत्याधुनिक असून भारताच्या वाढीत याचा मोठा वाटा असेल, असा विश्‍वास मोदींनी यावेळी व्यक्त केला. यावेळी केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू, केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम, मुख्यमंत्री पिनारयी विजयन उपस्थित होते.

Web Title: kochi news narendra modi and kochi metro