ममतांची आता 'भाजप हटाव' मोहीम

वृत्तसंस्था
शनिवार, 22 जुलै 2017

राज्य सरकारांना काम करू देत नसल्याचा मोदी सरकारवर आरोप

कोलकता: पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना "भाजप हटाव'ची मोहीम छेडणार असल्याची घोषणा केली. केंद्रातील सरकार राज्य सरकारांना काम करू देत नसल्याचा आरोप करतानाच, आम्ही त्यांचे नोकर नाही, असे त्यांनी सुनावले.

राज्य सरकारांना काम करू देत नसल्याचा मोदी सरकारवर आरोप

कोलकता: पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना "भाजप हटाव'ची मोहीम छेडणार असल्याची घोषणा केली. केंद्रातील सरकार राज्य सरकारांना काम करू देत नसल्याचा आरोप करतानाच, आम्ही त्यांचे नोकर नाही, असे त्यांनी सुनावले.

भारतातून भाजपला हद्दपार करण्याच्या कार्यक्रमाला 9 ऑगस्टपासून सुरवात करण्यात येईल, अशी घोषणा करून तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी भाजपच्या विरोधात 18 विरोधी पक्षांची आघाडी स्थापन करण्यात येईल आणि भविष्यात याची व्याप्ती वाढविली जाईल, असे स्पष्ट केले.

1993 मध्ये रायटर्स बिल्डिंगमधील पोलिस गोळीबारात ठार झालेल्या 13 लोकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 24व्या "शहीद दिवस'निमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, देश एका गंभीर परिस्थितीतून जात आहे आणि सध्याची स्थिती आणीबाणीपेक्षा कमी नाही. अशा परिस्थितीत कोणीही सुरक्षित नाही. गोरक्षाच्या नावाखाली लोक गो राक्षस बनले आहेत. काय खाल्ले पाहिजे आणि काय परिधान केले पाहिजे, याचा निर्णय आता ते घेत आहेत.

बाहेरच्या काही शक्ती येऊन राज्यात हिंसाचार पसरवित आहेत. आपण राज्यात जातीय हिंसाचार होऊ दिला नाही पाहिजे, असे नमूद करून शारदा गैरव्यवहाराचा उल्लेख करत त्या म्हणाल्या, की भाजप आपल्या पक्षात फूट पाडू पाहत आहे. आमच्याबरोबर या; अन्यथा शारदा-नारद गैरव्यवहार प्रकरणांचा सामना करा, अशा धमक्‍या भाजप आमच्या नेत्यांना देत आहे. दंगली घडविण्यासाठी पसरविण्यात येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अफवांविरुद्ध तृणमूलचे पहारेकरी नेहमीच सज्ज आहेत. 2019ची लोकसभा निवडणूक आपल्या खिशात आहे, असे वाटत असणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की त्यांच्या खिशाला छिद्र पडले आहे. 2019च्या निवडणुकीत भाजपला 30 टक्केही मते मिळणार नाहीत.

केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, की नेपाळ, बांगलादेश आणि भूतान यांच्याशी आपल्या देशाचे संबंध बिघडले आहेत. तृणमूल देशाचे संरक्षण करेल. काश्‍मीरमध्ये तर केवळ एकच सीमा आहे. पश्‍चिम बंगाल तीन देशांच्या सीमेवर आहे. जर बंगालला काही अडचण आली तर देशासाठी धोका निर्माण होऊ शकतो.

ममतांमुळेच दार्जिलिंगमध्ये अशांतता : केंद्र सरकार
नवी दिल्ली : दार्जिलिंगमधील अशांततेला पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच जबाबदार असल्याचा आरोप सरकारने आज केला. ममतांचा दृष्टिकोन आणि हा विषय त्यांनी ज्या पद्धतीने हाताळला, त्यातूनच शांतता नांदणारे दार्जिलिंग होरपळत असल्याची टीका सरकारने शुक्रवारी केली. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महंमद सलीम यांनी लोकसभेत दार्जिलिंगचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर संसदीय कामकाजमंत्री अनंत कुमार यांनी दार्जिलिंगमधील परिस्थिती गंभीर असल्याचे नमूद केले. सलीम यांनी या मुद्यावर त्रिपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी करताना केंद्राने पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना घटनेनुसार काम करण्यास सांगावे अशी मागणी केली.

Web Title: kolkata news mamta banerjee and bjp