नोटाबंदीवर टीका करणाऱ्या सुजित बॅनर्जी यांची आत्महत्या

file photo
file photo

कोलकता : केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केल्याने चर्चेत आलेले हावडा येथील संघप्रणीत विवेकानंद शिशू मंदिर या संस्थेचे मुख्याध्यापक सुजित बॅनर्जी यांनी राहत्या घराजवळ बांबूच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी या शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन समितीमधील काही लोकांच्या त्रासाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची चौकशी करायला सुरवात केली आहे.

सुजित बॅनर्जी हे विवेकवादी विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जात असत. नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केल्यानंतर त्यांनी शाळेमध्ये हिंदुत्वाचे पाठ शिकविण्याऐवजी स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांच्या शिकवणीचा प्रचार करायला सुरवात केली होती. याबरोबरच आपण विद्यार्थ्यांना या शिकवणीशी सुसंगत असणारा कुरआनमधील भागही शिकवू असे त्यांनी व्यवस्थापन समितीला सांगितले होते. तेव्हापासून या समितीमधील काही मंडळी त्यांच्यावर डूख धरून होती. काही दिवसांपूर्वी सुजित यांना शाळेच्या खात्यात 19 लाख रुपयांची अफरातफर झाल्याचे आढळून आले होते. याची गंभीर दखल घेत त्यांनी ही बाब आपण संघ नेतृत्वाच्या नजरेस आणून देऊ, असा स्पष्ट इशाराच व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना दिला होता.

समितीचे सदस्य फरार
बॅनर्जी यांच्या इशाऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्याविरोधात एका महिला शिक्षिकेने लैंगिक शोषणाची तक्रार नोंदविली. व्यवस्थापन समितीने ही संधी साधत बॅनर्जी यांना राजीनामा देण्यास सांगितले होते; तसेच या प्रकाराची पोलिस चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. बॅनर्जी यांना हा अवमान सहन झाला नाही आणि त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आत्महत्येनंतर स्थानिकांनी हे प्रकरण लावून धरले. यासाठी रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी पोलिस चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लागताच व्यवस्थापन समितीतील अनेक सदस्य फरार झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com