वैज्ञानिक दळणवळणासाठी देशी भाषा वापरा; मोदींचे आवाहन

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 जानेवारी 2018


गेल्या वर्षात सर्व भारतीयांनी पूर्वजांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याची प्रतिज्ञा केली होती. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व भारतीयांनी आपल्या संपूर्ण ऊर्जेचा वापर करावा.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

विज्ञानाबाबत प्रेम निर्माण करण्यासाठी पंतप्रधान मोदींचे आवाहन

कोलकता : युवकांमध्ये विज्ञानाबाबत प्रेम निर्माण व्हावे, यासाठी शास्त्रीय ज्ञानाचे आदान-प्रदान करताना देशी भाषांचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. भाषा ही अडचण न ठरता माध्यम ठरावे, असेही मोदी या वेळी म्हणाले.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कोलकत्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. भाषणाच्या सुरवातीलाच मोदी यांनी बंगाली भाषेतून येथील नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी विज्ञानप्रसारासाठी योगदान देण्याचे आवाहन युवकांना केले. नव्या भारताच्या निर्माणासाठी देशातील शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी नवनवीन संकल्पना आणि संशोधन यांच्यासाठी दिशादर्शन करावे, असे मोदी या वेळी म्हणाले. "युवकांमध्ये विज्ञानाची समज आणि प्रेम निर्माण व्हावे यासाठी वैज्ञानिक ज्ञानाचे दळणवळण मोठ्या प्रमाणावर वाढणे आवश्‍यक आहे. त्यासाठी स्थानिक भाषांचा मोठ्या प्रमाणावर वापर व्हावा. संशोधनाचा गरीब जनतेला किती फायदा होतो, यावरून त्याचा दर्जा ठरविला जावा. युवा संशोधकांनी चौकटीबाहेर विचार करत तंत्रज्ञानाला वेगळी दिशा द्यावी. प्रत्येक शास्त्रज्ञाने एका तरी बालकाला वैज्ञानिक दृष्टिकोन द्यावा,' असे आवाहन मोदींनी या वेळी केले.

केंद्र सरकारने सौरऊर्जा, हरित ऊर्जा, जलसंवर्धन या क्षेत्रांमध्ये संशोधनासाठी विविध प्रकल्प सुरू केले असल्याचेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.

Web Title: kolkata news Use indian language for scientific communication; Modi's appeal