चिक्कोडी तालुक्यात कृष्णा नदीला महापुराचा धोका 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

चिक्कोडी तालुक्‍यात पावसाने उघडीप दिली असली तरी महाराष्ट्रातून वाहून येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याने राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटकातील नद्यांच्या पात्रात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात आणखी 2 हजार क्‍युसेकनी वाढ झाली आहे. परिणामी तालुक्‍यातील नद्यांना पूर आला असून कृष्णेला महापुराचा धोका आहे. 

चिक्कोडी - महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कालच्यापेक्षा पुन्हा कमी झाला आहे. मात्र गेल्या चार दिवसात पडलेल्या मुसळधार पावसाचे पाणी कर्नाटकात वाहून येत आहे. तालुक्‍यात पावसाने उघडीप दिली असली तरी महाराष्ट्रातून वाहून येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याने राजापूर बंधाऱ्यातून कर्नाटकातील नद्यांच्या पात्रात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात आणखी 2 हजार क्‍युसेकनी वाढ झाली आहे. परिणामी तालुक्‍यातील नद्यांना पूर आला असून कृष्णेला महापुराचा धोका आहे. 

तालुक्यातील आठ पैकी सहा बंधारे पाण्याखाली

दूधगंगेचे पाणी आता पात्राबाहेर पडले आहे. तालुक्‍यातील आठ पैकी सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर चारही विभागात आज (ता.9) सकाळपासून पावसाची सतत रिपरिप सुरु होती. राजापूर बंधाऱ्यातून वाहून येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात 2 हजार क्‍युसेकनी वाढ झाल्याने कृष्णेला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. 

पाण्याचा विसर्ग असा

महाराष्ट्रातील राजापूर बंधाऱ्यातून प्रतीसेकंद 61 हजार 310 क्‍युसेक तर हिप्परगी जलाशयात प्रतीसेकंद 64 हजार 500 क्‍युसेक पाणी वाहून येत असून 64 हजार 400 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर अलमट्टी जलाशयात प्रतीसेकंद 69 हजार 810 क्‍युसेक पाणी वाहून येत असून 6 हजार 850 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. 

आज (ता.9) सकाळी महसूल खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान असे - कोयना 95.0 मी. मी., नवजा 83.0 मी. मी., महाबळेश्‍वर 128.0 मी. मी., वारणा 154.0 मी. मी., सांगली 6.0 मी. मी., कोल्हापूर 18 मी. मी., काळम्मावाडी 184.0 मी.मी., राधानगरी 130.0 मी. मी., पाटगाव 114.0 मी.मी. 

चिक्कोडी तालुक्‍यातील पर्जन्यमान असे

चिक्कोडी 1.0 मी. मी., सदलगा 5.5 मी. मी., निपाणी (पीडब्ल्युडी) 5.0 मी. मी., अंकली 8.6 मी. मी., गळतगा 11.0 मी. मी., निपाणी (एआरएस) 8.0 मी. मी., नागरमुन्नोळी 1.8 मी. मी., जोडट्टी 1.4 मी. मी., सौंदलगा 17.1 मी. मी. 

 हे बंधारे पाण्याखाली
चिक्कोडी-निपाणी तालुक्‍यातील आठ पैकी सहा बंधाऱ्यावर पाणी आल्याने वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे. कृष्णा नदीवरील कल्लोळ-येडूर, वेदगंगा नदीवरील भोजवाडी-कून्नूर, जत्राट-भिवशी, कारदगा-भोज, सिदनाळ-अक्कोळ, दूधगंगा नदीवरील मलिकवाड-दत्तवाड बंधाऱ्यावर पाणी आल्याने यावरुन वाहतूक ठप्प झाली आहे.  
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Krishna river in Chikkodi taluka is under threat of flood