काळे, चतुरसह चौघांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याची तयारी

काळे, चतुरसह चौघांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याची तयारी

बंगळूर - ज्येष्ठ विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येला चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर विशेष तपास पथकाने (एसआयटी) मुख्य संशयित आरोपी अमोल काळे, प्रवीण चतुर यांच्यासह चौघांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
३० ऑगस्ट २०१५ ला पहाटे कलबुर्गी यांची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर आरोपी फरारी झाले होते.

या संदर्भात तपास करण्यासाठी तत्कालीन सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली होती. एसआयटी पथकाने प्रकरणाच्या तपासाला गती देऊन प्रकरणातील मास्टर माईंड अमोल काळे व या प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपावरून प्रवीण चतुर यांना एसआयटी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर एसआयटी अधिकाऱ्यांनी आता आरोपपत्र दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोपींची बंगळुरात विविध अंगाने चौकशी झाली. त्यानंतर गौरी लंकेश व कलबुर्गी या दोन्ही हत्या प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याची निश्‍चित माहिती उपलब्ध झाली असल्याचे समजते. दोन्ही हत्यांसाठी एकाच पिस्तूलाचा वापर केल्याचा एसआयटीला संशय आहे.

आरोपींची चौकशी केल्यानंतर त्यांना धारवाडला आणून कलबुर्गी यांच्या निवास परिसरात नेऊन चौकशी करण्यात आली. आरोपींनी कलबुर्गी यांच्या हत्याप्रकरणात आपला सहभाग असल्याचे मान्य केले असल्याचे समजते. महाराष्ट्रातील अमोल काळे याला २१ मे रोजी अटक केली होती. त्याला शहरातील तिसऱ्या अतिरिक्त जेएमएफसी न्यायालयासमोर हजर करून एसआयटीने त्याला ७ जूपर्यंत आपल्या ताब्यात ठेवले होते. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे बेळगावच्या प्रवीण चतुरला ३१ मे रोजी अटक केली.

अलिकडेच गौरी लंकेश हत्या प्रकरणात अटक केलेल्या हुबळीच्या गणेश मिस्कीन याची कसून चौकशी केली असता, हत्येच्या दिवशी आरोपींनी निळ्या-काळ्या रंगाची १२५ सीसी डिस्कव्हरी दुचाकी वापरल्याची माहिती उपलब्ध झाली. एसआयटी अधिकाऱ्यांचे पथक मंगळूरला जाऊन याची चौकशी करणार आहे. कलबुर्गी हत्या प्रकरणातील मारेकऱ्यांना मंगळूरला प्रशिक्षण दिल्याचे समजते. एकंदर या प्रकरणातील आरोपींची चौकशी करून त्यांना आता न्यायालयाच्या ताब्यात देण्याची एसआयटी पथकाने तयारी केली आहे.

गौरी प्रकरणात प्रवीणची साक्ष
कलबुर्गी हत्या प्रकरणात अटक केलेल्या प्रवीण चतुरची गौरी लंकेश हत्या प्रकरणात साक्ष देण्यात आली आहे. प्रवीणने गणेश मिस्कीनच्या मदतीने कलबुर्गी यांची हत्या केल्याचे तपासात आढळून आले. पद्मावत हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी प्रवीण चतुरनेच बेळगावातील चित्रपटगृहावर पेट्रेलबाँब फेकल्याचा आरोप होता. त्यामुळे या प्रकरणातही त्याला अटक केली होती. महाराष्ट्रातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संघटनेच्या बैठकांना तो सतत हजर राहत होता, अशी माहितीही स्पष्ट झाली आहे. गौरी लंकेश प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतून प्रथम प्रवीणचेच नाव पुढे आले. परंतु, गौरी लंकेश हत्या प्रकरणात त्याचा थेट सहभाग दिसून न आल्याने आरोपपत्रात त्याचे साक्षीदार म्हणून नाव नोंद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com