कुलभूषण जाधव प्रकरण; खटला थांबविण्याची पाकची मागणी फेटाळली

वृत्तसंस्था
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

कुलभूषण जाधव प्रकरणाचा खटला स्थगित करण्याची पाकिस्तानची मागणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आज फेटाळली. त्यामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. 

हेग : कुलभूषण जाधव प्रकरणाचा खटला स्थगित करण्याची पाकिस्तानची मागणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आज फेटाळली. त्यामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. 

आंतरराष्ट्रीय न्यायालयात सध्या भारताचे नागरिक कुलभूषण जाधव यांच्या सुटकेबाबतच्या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. भारताने काल बाजू मांडताना त्यांच्या सुटकेची मागणी केली होती. जाधव यांच्यावर पाकिस्तानातील लष्कारी न्यायालयात खोटा खटला चालवला गेला आणि त्यांना मृत्यूुदंड देण्यात आला, तो रद्द करावा, असा युक्तिवाद भारताच्या वतीने करण्यात आला होता. पाकिस्तानने आज बाजू मांडली. 

हंगामी न्यायाधीशांच्या नियुक्तीला पाकिस्तानने आज आक्षेप घेतला व ही सुनावणी स्थगित करण्याची मागणी केली. मात्र, आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. ""पाकिस्तानचे म्हणणे नोंदविण्यात आले असून, त्याला योग्य वेळी उत्तर देण्यात येईल,'' असे न्यायालयाने स्पष्ट केले. 
पाकिस्तानतर्फे ऍटर्नी जनरल अन्वर मन्सूर यांनी बाजू मांडली. त्यांनी भारतच दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा कांगावा केला. मन्सूर म्हणाले, ""मी स्वतः भारतीय क्रूरतेचा शिकार झालो आहे. एक तरुण लष्करी अधिकारी म्हणून मला भारतातील तुरुंगात ठेवण्यात आले होते. पाकिस्तानच्या "आर्मी स्कूल'मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 140 निरपराध मुलांचा जीव गेला होता. हा भारतपुरस्कृत व फगाणिस्तानकडून केलेला दहशतवादी हल्ला होता.'' 

पाकिस्तानने युक्तिवादामध्ये जाधव यांचाही उल्लेख दहशतवादी म्हणून केला. ""जाधव अनेक स्थानिक लोकांच्या संपर्कात होते. तसेच त्यांनी अनेकांना आत्मघाती हल्लेखोर बनण्यासाठी तयार केले होते. पाकिस्तानात दहशत निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी हे कृत्य केले होते. जाधव यांनी चीन-पाकिस्तान कॉरिडॉरलाही धोका पोहोचवण्याचा प्रयत्न केला. हे कोणा एका व्यक्तीचे काम नाही, तर यामागे भारताचे कारस्थान आहे,'' असा कांगावाही पाकिस्तानने केला. 

पाकिस्तानात अशांतता माजविण्यासाठी 1947पासून भारताकडून प्रयत्न केले जात असल्याचा खोटा आरोपही त्यांनी केला. "जाधव यांना रविवारी भेटण्याची परवानगी त्यांच्या नातेवाइकांना दिली होती. मात्र, भारतातील तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या बाबतीत अशी मानवतेची वागणूक देण्यात आलेली नाही,'' अशी गरळही पाकिस्तानने ओकली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kulbhushan Jadhav Case Pakistan's plea rejected by the court